बांदा
विलवडे येथील पत्रकार अजित दळवी यांच्या घरात भर दुपारी धाडसी चोरी झाली आहे. घराचा मुख्य दरवाजा फोडून कपाटातील रोख ६ हजारांची रोकड घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. थोड्याच वेळात ठसेतज्ञ व श्वानपथक दाखल होणार आहे. दळवी यांच्या घरातील वर्षभरातील ही चोरीची दुसरी घटना आहे.
पत्रकार अजित दळवी हे आपल्या पत्नी व मुलीसमवेत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बांदा बाजारपेठेत आले होते. हीच संधी साधून चोरट्याने प्रथम घराच्या मागील बाजूने पडवीवर चढून कौले काढून किचनमध्ये प्रवेश केला. मात्र किचनच्या दरवाजाला चावी असल्याने त्याचा घरात जाण्याचा बेत फसला. त्यानंतर त्याच मार्गाने माघारी येत त्याने समोरील मुख्य दरवाजाचे कुलूप कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.
खोलीतील कपाट फोडून त्यातील ६ हजारांची रोकड चोरट्याने लंपास केली. कपाटातील सामान अस्ताव्यस्त टाकले होते. विलवडे ग्रा. पं. सदस्या सौ. अपर्णा दळवी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला घरी आल्या असता त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप फोडलेले निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पती अजित दळवी यांना दिली.
बांदा पोलीसात चोरीची माहिती दिल्यानंतर एपीआय शामराव काळे व काँस्टेबल विजय जाधव घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विलवडे सरपंच प्रकाश दळवी उपस्थित होते. श्वानपथक व ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. भर दिवसा झालेल्या चोरी प्रकरणात चोरटा स्थानिक असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. चोरट्याचा तपास करण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे.