You are currently viewing दीपक केसरकर आणि नारायण राणे सावंतवाडीत येणार एकाच मंचावर

दीपक केसरकर आणि नारायण राणे सावंतवाडीत येणार एकाच मंचावर

*सावंतवाडी शहरवासीयांना हे रुचणार का..?*

 

*याची डोळा पहावा सावंतवाडीकरानी….*

 

राजकारण म्हटलं की त्यात काहीही होऊ शकतं असंच म्हटलं जातं. राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र बनेल हे कोणीही सांगू शकत नाही; तर ते फक्त येणारा काळच ठरवतो. सावंतवाडीत मंगळवारी सकाळी दहा वाजता संत गाडगेबाबा मंडईच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सावंतवाडीत येत आहेत. यावेळी सावंतवाडीवासीयांकडून त्यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा जयप्रकाश चौक सावंतवाडी येथे आयोजित केला आहे.

या सोहळ्यासाठी राज्यातील अनेक मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, ना. उदय सामंत, आ.नितेश राणे, आ.वैभव नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सावंतवाडीतील उद्याच्या नियोजित नागरी सत्कार सोहळ्यासाठी दीपक केसरकर व केंद्रीय मंत्री नारायण राणे पहिल्यांदाच सावंतवाडी शहरातील एका जाहीर कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत, त्यामुळे सावंतवाडी शहरात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

काही वर्षांपूर्वी सावंतवाडी येथील बाहेरचावाडा येथे नाम.नारायण राणे यांनी कॉर्नर सभा घेतली होती. या कॉर्नर सभेच्या वेळी दीपक केसरकर यांच्या विरोधात प्रचार करताना, “दीपक केसरकर यांचे वडील स्मगलर होते” अशा प्रकारची टीका केली होती. त्यावेळी नारायण राणे यांच्याकडून केलेली खालच्या पातळीवरील टीका सावंतवाडीवासियांना रुचली नव्हती आणि त्याचाच परिणाम सावंतवाडी नगरपालिकेत दीपक केसरकर यांची एक हाती सत्ता आली होती, ही वस्तुस्थिती आहे. सावंतवाडीवासिय सावंतवाडी शहरातील लोकप्रतिनिधी असलेले दीपक केसरकर यांच्यावरील टीका सहन करत नव्हते; त्यामुळे केसरकर यांच्यावरील टिकेचे उत्तर सावंतवाडीवासीयांनी आपल्या मतदानातून दिले होते हे जळजळीत वास्तव आहे. बदलत्या राजकीय घडामोडीत नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केला तर दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षाच्या फुटी नंतर बाळासाहेब यांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत राहिले. बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची महाराष्ट्रात युतीची सत्ता असून नाम.दीपक केसरकर युती सरकार मधील कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे पर्यायाने त्यांना भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत पूर्वी मतभेद असले तरी जुळवून घेणे आवश्यक बनले आहे.

दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार असल्यापासून नारायण राणे यांच्या विरोधात दंड थोपटले होते, आणि दहशतवादाचे कारण पुढे करत केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात नारायण राणे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. त्याचा परिणाम म्हणजे नारायण राणे यांची एक हाती असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यावरची पकड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदारकी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची खासदारकी त्यांच्या हातून निसटली होती. केवळ देवगड मतदार संघातील त्यांचे चिरंजीव आम.नितेश राणे हे मात्र निवडून आले होते. नारायण राणे यांच्या विरोधात त्यावेळी उघड उघड भर सभेतून बोलणारे, त्यांना आव्हान देणारे असे दीपक केसरकर हे एकमेव नेते होते. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्हा बाहेरील लोकांनी देखील दीपक केसरकर यांची पाठराखण केली होती. त्याचे फलित म्हणजे नाम.दीपक केसरकर तीन वेळा मोठ्या मताधिक्याने सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघात निवडून आले; त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात दोन वेळा मंत्री म्हणून शपथ घेतली. दीपक केसरकर यांच्या सर्व यशस्वी घडामोडींमध्ये मतदारसंघातील जनतेबरोबरच सावंतवाडी शहरवासीयांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरातच होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याच्यावेळी दीपक केसरकर व केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार हे सावंतवाडी वासियांना कितपत रुचते ते पाहणे मात्र औस्तुक्याचे ठरणार आहे. उद्याच्या सभेकडे आणि सत्कार सोहळ्याकडे जनतेचा जेवढा लक्ष आहे, त्यापेक्षा जास्त लक्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्या एकाच व्यासपीठावर येण्याकडे लागला आहे. कारण गेली पंधरा वर्षे दीपक केसरकर यांनी जे काही राजकारण केलं आणि राजकारणात यशस्वी झाले ते केवळ आणि केवळ नारायण राणे यांचे विरोधक म्हणूनच. कारण सावंतवाडीकर जनतेला राजकारण म्हणजे इतर शहरांप्रमाणे हाणामारी, भांडणतंटे झालेले पटणार नाहीत तर शहराच्या विकासापेक्षाही शहराची शांतता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळेच सावंतवाडी वासियांनी तब्बल पाव शतक दीपक केसरकरांसारख्या शांत संयमी नेतृत्वाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आहे. उद्याच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त सावंतवाडीतील जयप्रकाश चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे व दीपक केसरकर एकाच व्यासपीठावर येतात का..? आणि तिथे काय घडते..? याकडे समस्त सावंतवाडी वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीत राजकारणातील ही दोन विरुद्ध टोकं सावंतवाडी एकाच व्यासपीठावर एकत्र येतात आणि या दोन टोकांची सुकर गाठ घट्ट बांधली जाईल का..? आणि असे घडल्यास हे सावंतवाडीतील जनतेला रुचणार का..? हे पाहणे मात्र औस्तुक्याचे ठरेल.