ग्राहक पंचायतची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.
वैभववाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खंडाने शेती करण्यात येत आहे. यावर्षी अवकाळी व परतीच्या पावसामुळे या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने अध्यक्ष-जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात याचा सर्वे होऊन सर्व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी. वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खंडाने जमिनी घेऊन त्यामध्ये भात शेती केली जाते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या नावे जमीन नसल्यामुळे त्या जमिनीत केलेली भात शेती वाया गेली तरी त्यांना भरपाई मिळत नाही. जमीन मालकांना भरपाई मिळते. एक तर खंड द्यायचा आणि दुसरीकडे पावसाने सर्व हिरावून घेतले तर दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. त्यामुळे खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी आम्ही या निवेदनाव्दारे आपणाकडे करीत आहोत.
आम्ही केलेल्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन योग्य कार्यवाही करावी अशी विनंती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, जिल्हा संघटक एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष, संदेश तुळसणकर व वैभववाडी तालुका संघटक शंकर स्वामी यांनी केली आहे.