You are currently viewing ३१ मे तंबाखू विरोध दिनानिमित्त स्पेशल रिपोर्ट

३१ मे तंबाखू विरोध दिनानिमित्त स्पेशल रिपोर्ट

*तंबाखू व्यसनाच्या विरोधात १०० हून अधिक मुंबई पोलीस अधिकार्‍यांनी घेतली शपथ*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल, गिरगाव, मुंबई यांनी तंबाखूच्या व्यसनाला कसा आळा घालता येईल यावर १०० हून अधिक पोलिसांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती. आज, ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त त्यांनी याच्या वापराविरुद्ध शपथ घेतली.

या उपक्रमाद्वारे, सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे उद्दिष्ट तंबाखूच्या व्यसनाच्या धोक्यांबद्दल जागरूकता पसरवणे आणि तंबाखूच्या सेवनाविरुद्ध प्रतिज्ञाबद्ध करणे आणि चांगले आरोग्य आणि कर्करोगमुक्त जीवनाकडे एक पाऊल पुढे टाकणे आहे.

डॉ. मोहित गर्ग (आयपीएस) पोलिस उपायुक्त झोन २ मुंबई, म्हणाले, “नागरिकांचे गुन्हेगारीपासून संरक्षण करणे आणि देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्यास आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. चांगले आरोग्य राखणे ही आपणा सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. आपल्या अस्तित्वाला बाधा आणणारी एखादी गोष्ट सोडण्यास सक्षम असणे कठीण असले तरी खूप आवश्यक आहे. माझ्या अधिकार्‍यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सर एचएन रिलायन्स रूग्णालय आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.”

भारतात सुमारे २८.६% प्रौढ लोक तंबाखूचा वापर करतात. ही चिंताजनक आकडेवारी देशात मोठ्या प्रमाणात तंबाखूशी संबंधित कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ दर्शवते. भारतात, फुफ्फुस आणि डोके आणि मानेच्या कर्करोगासह, कर्करोगाच्या जवळजवळ ५०% प्रकरणांसाठी तंबाखूचा वापर जबाबदार आहे, ज्यामुळे कर्करोगाशी संबंधित मृत्यूचे प्रमुख कारण बनते. रुग्ण बरा होण्यास आडकाठी निर्माण करते. सदर उपक्रमाद्वारे जनजागृती करणे आणि जीव वाचवणे हे फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे.

सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. तरंग ग्यानचंदानी म्हणाले, “आम्ही सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये ऑन्कोलॉजीसह सर्वोत्कृष्ट काळजी प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या उपक्रमामुळे, आम्हाला एक प्रभावी पाऊल उचलण्याची आशा आहे. तंबाखूच्या सेवनाला आळा घालण्यासाठी अधिक जागरूकता आणि उत्तरदायित्व पसरवून कॅन्सर प्रतिबंधाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने आपल्या शहरातील पोलिस कर्मचार्‍यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आज त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली, हा खर्‍या अर्थाने आम्ही आमचा सन्मान समजतो. जास्तीत जास्त लोकांना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी आम्ही आमचे उपक्रम सुरू ठेवू. तंबाखूच्या वापराचे धोके तसेच प्रतिबंध ही चांगल्या आणि निरोगी समाजाची गुरुकिल्ली आहे.”

सदर कार्यशाळा डॉ. सुरेश अडवाणी, मार्गदर्शक, डॉ. विजय हरिभक्ती, संचालक ऑन्को सायन्सेस, डॉ. सेवंती लिमये, संचालक, मेडिकल ऑन्कोलॉजी आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी आणि डॉ. प्रसाद दांडेकर, रेडिएशन ऑन्कोलॉजी प्रमुख यांनी घेतली. चर्चेत तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारांवर लक्ष केंद्रित केले गेले आणि तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम, सोडण्याचे मार्ग आणि भावी पिढ्यांना या सवयीपासून परावृत्त करण्यावर शिक्षित केले.

सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाने व्यक्त केले की, “देशातील ५०% कर्करोगाच्या घटनांना केवळ तंबाखू जबाबदार आहे. पोलिस हे शहर ज्याच्यावर उभे आहे ते महत्त्वाचे स्तंभ आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य अधिक चांगले असावे असे आम्हांला वाटते. त्यांना तंबाखूच्या वापराविरुद्ध प्रतिज्ञाबद्ध करताना आम्हांला आत्यानंद होत आहे. उपक्रमाचा मुख्य उद्देश तोंडाच्या कर्करोगाविषयी जागरूकता, प्रतिबंध आणि उपचार हा होता. त्याचप्रमाणे, तोंडाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यास मदत करणारे इतर उपाय आहेत. आरोग्यसेवा विकसित होत आहे. कर्करोगावर उपचार करण्यासाठी आणि रुग्णांना दर्जेदार जीवनमान मिळवून देण्यासाठी ते तंत्रज्ञान, आधुनिक विज्ञान आणि प्रगत औषधांच्या सहाय्याने काम करत आहे.”

डॉ. सेवंती लिमये, संचालक, मेडिकल ऑन्कोलॉजी आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी, सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल यांनी निदर्शनास आणून दिले, “जगातील सर्वात जास्त संशोधन झालेल्या आजारांपैकी कर्करोग हा एकच आजार आहे. तथापि, तंबाखू हे एक महत्वाचे कारण आहे. जेव्हा तंबाखूच्या विविध स्वरूपातील कर्करोगजन्य प्रभावाचा विचार केला जातो तेव्हा कोणताही अवयव सोडला जात नाही. कर्करोगाच्या बाबतीत, मोठी जोखीम न घेणे आणि उपचारापेक्षा प्रतिबंध निवडणे नेहमीच चांगले असते. त्याला आळा घालणे ही कर्करोगमुक्त जगाकडे वाटचाल करण्याची पहिली पायरी आहे. आमचे संरक्षण करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेत असलेल्या आमच्या पोलिसांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्याप्रमाणेच, तंबाखूच्या सेवनाच्या दुष्परिणामांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी तंबाखू बंद करण्याबाबत जागरूकता निर्माण करून आणि कर्करोग तपासणी कार्यक्रम सुरू करून त्यांना कर्करोगमुक्त राहण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.”

औपचारिक प्रतिज्ञा घतल्यानंतर सर्व पोलिसांनी रूग्णालयामध्ये तयार केलेल्या प्रतिज्ञा भिंतीवर विविध रंगांमध्ये हात बुडवून त्याचे ठसे उमटवले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 20 =