मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
दरवर्षीप्रमाणे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मान्सूनसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. आपत्कालीन नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार असून ३० सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. पावसाळ्यात एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळी तसेच प्रकल्पाच्या परिसरात निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण या कक्षाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मेट्रो, मुंबई पोरबंदर प्रकल्प, सांताक्रूझ – चेंबूर द्रुतगती मार्ग विस्तारित प्रकल्प, ऐरोली – काटई नाका द्रुतगती मार्ग तसेच भुयारी मार्ग, शिवडी – वरळी उन्नत मार्ग, पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प, मुंबई महानगर प्रदेशातील विस्तारित एमयूआयपी – विविध रस्ते, पूल अंतर्गत ओएआरडीएस, यामध्ये उड्डाणपुलांसारख्या विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. पावसाळ्यात या कामाच्या ठिकाणी व परिसरात पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, वाहतूक कोंडी, अपघात आदी घटना घडतात. अपघात टाळण्यासाठी किंवा अपघात झाल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी एमएमआरडीएकडून दरवर्षी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला जातो.
सदर कक्ष संपूर्ण पावसाळ्यात कार्यरत असतो. या नियंत्रण कक्षांतर्गत तक्रारींचा २४ तास पाठपुरावा केला जातो आणि मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, रेल्वे आदींच्या आपत्ती नियंत्रण कक्षांशी समन्वय साधला जातो. तसेच माहितीची देवाणघेवाण करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जाते. या नियंत्रण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत. एमएमआरडीएने सर्व संबंधित कंत्राटदारांना आपत्कालीन नियंत्रण कक्ष उभारतानाच सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ज्या ठिकाणी सांडपाण्याचा निचरा होणार नाही आणि पावसाचे पाणी साचण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी अतिरिक्त क्षमतेचे पाणी उपसण्याचे पंप बसविण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिक १ जून २०२३ पासून आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५९१२४१ / २६५९४१७६, मोबाईल क्रमांक ८६५७४४०२०९० आणि १८००२२८८०१ 1 (टोल फ्री) वर संपर्क साधून नियंत्रण कक्षाकडून मदत मिळवू शकतात.