*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*शब्दप्रभाव*
“तिळगुळ घ्या आणि गोड बोला” हे खरं म्हणजे आपल्या संस्कृतीचे ब्रीद वाक्य आहे.
ज्या शब्दांमधून आपण आपले विचार, मतं मांडत असतो, एकमेकांशी संवाद साधत असतो, व्यवहार करत असतो त्यावरूनच आपला स्वभाव, वृत्ती, व्यक्तिमत्वही ठरत असते. जेव्हां आपण म्हणतो फारच तिरसट आहे ती— त्याचवेळी आपण दुसर्या एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हां म्हणतो की किती लाघवी आहे, तेव्हां दोन्ही भिन्न व्यक्तिमत्वे त्यांच्या वागण्यावरून म्हणजेच त्यांच्या संवाद भाषेवरूनच प्रामुख्याने ठरत असतात. म्हणजे या सर्वांच्या केंद्रस्थानी असतो तो शब्दांचा वापर.
धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून सुटलेला शब्द परत मागे घेता येत नाही. त्यामुळे शब्द हे जपूनच वापरले पाहिजेत, कारण शब्द ही शस्त्रे आहेत. ती दुधारी आहेत आणि ती जसं जोडण्याचे काम करतात तितक्याच प्रखरतेने तोडण्याचे कामही करतात.
THINK TWICE BEFORE YOU SPEAK
असे म्हटलेलेच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भावना आणि शब्द यांचं घट्ट नातं आहे. जेव्हां व्यक्ती संतापलेली असते, क्रोधाचा पूर्ण अंमल तिच्यावर चढलेला असतो, खूप काही तिच्या मनाविरुद्ध झालेले असते, तेव्हां बोलताना भान उरत नाही. समोर दिसेल त्यावर ती शब्दांची टोकदार शस्रे चालवत राहते. आणि परिणामी स्नेहसंबंधांची, नात्यांची पार तोडमोड होते. नंतर राग शांतही होतो आणि पश्चात्तापाची भावना टोचू लागते. तेव्हां उशीर झालेला असतो. कितीही माफी मागितली, क्षमा याचना केली तरी तुटलेले पुन्हा पूर्ववत सांधेलच याची खात्री देता येत नाही. म्हणूनच शब्द हे कुठल्याही मानसिकतेत जपूनच वापरायला हवेत.
पाणी मर्यादा तोडे तो विनाश
और
वाणी मर्यादा तोडे तो सर्वनाश।।
शब्द तोडतात आणि शब्द जोडतात शब्दाने झालेले घाव कधी कधी शब्दांच्याच शीतल फुंकरीने भरतात. हे शब्द हसवतातही. शब्द रडवतातही. शब्द बोथट असतात, शब्द धारदार असतात. शब्दा शब्दांनी वाद वाढतात. राईचा पर्वत होतो. होत्याचे नव्हते होते. शब्द फुले असतात. शब्द अंगार असतात. त्यामुळे कोणत्या प्रसंगी कोणते शब्द वापरावेत याचे भान प्रत्येकाने ठेवलेच पाहिजे.
मौनं सर्वार्थ साधनम् ।।
असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अव्यक्त शब्दांमधली सकारात्मक ताकद अनुभवायला मिळते.
” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या धारदार शब्दाने स्वातंत्र्याच्या क्रांतीज्योती पेटल्या.
” जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा”
या शब्दांनी मराठी माणसाची छाती अभिमानानेच फुलली.
मोडला नाही कणा। फक्त लढ म्हणा।।
या शब्दांनी खचलेल्या मनाला उभारी दिली. अशा शब्दांचा इतिहास अफाट आहे. अथांग आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणते शब्द कधी, कुठे, आणि कशा रीतीने वापरायचे हे व्यक्तीसापेक्ष आहे. जोडायचं की तोडायचं या मनोवृत्तीवर निर्भर आहे.
शब्द हे जबरदस्त हत्यार आहे. जे फाडतही आणि शिवतातही.
सारी हत्यारे भांडत होती
कोण जास्ती मोठी जखम देते
शब्द माझ्या कुशीत बसून
हळूच हसत होते ।।
असे असतात शब्द!
आज राजकीय नेते यांच्यात तर बोलण्याची चढाओढच जणू लागलेली असते. एकेका शब्दाने वातावरण तापते. ‘मग क्षमा मागा’, ‘शब्द मागे घ्या’, ‘अब्रुनुकसान भरपाई द्या’ असे नवेच वादविवाद सुरू होतात. कुणाच्या धार्मिक भावना दुखावतात. कुणाच्या इतिहासाला धक्का पोहचतो,कुणाच्या संस्कृतीवर वार होतो. मात्र माध्यमांना चर्चासत्र घ्यायला विषय मिळतात. आणि या शब्दगंगेच्या गटारात देशाचे भवितव्य अक्षरश: चिखलात फेकले जाते.
तेव्हां लक्षात घ्या शब्दांची नकारात्मक आणि सकारात्मक ताकद. आणि या शब्दशस्रांचा योग्य वापर करा. जपून बोला. वाणीवर ताबा ठेवा.
राधिका भंडारकर पुणे.