– जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस
सिंधुदुर्गनगरी
अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देणे बाबतचा शासन निर्णयामध्ये नमूद १४ अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या खेळाडुंना पुढील बाबींसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इ. देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहीत्य आयात / खरेदी करणे, गणवेश इ. या योजनेसाठी पुढील स्पर्धा अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे. ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियपशिप, युथ ऑलिम्पिक, ज्यु. विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप या स्पर्धा आहेत. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्या खेळ / क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ / क्रीडा प्रकार वरील नमूद इतर स्पर्धांमध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय होतील. मात्र अपवाद कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद उपरोक्त शासन निर्णयान्वये करण्यात आलेला आहे. उपरोक्त विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्हयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, संचलनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुगे बालेवाडी, पुणे यांचेकडे सादर करण्याचे आवाहन ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, ,क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत, यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळांडूच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडुंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन क्रीडा धोरण २०१२ तयार करण्यात आले आहे.
अर्जाचा नमुना क्रीडा विभागाच्या sports.maharastra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहिती करिता आपले जिल्हयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय किंवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.