बांदा
गोविंद काजरेकर यांच्या ‘सुन्नतेचे सर्ग’ या दुसऱ्या कवितासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा धम्मपाल रत्नाकर हा राज्यस्तरीय पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोविंद काजरेकर हे महाराष्ट्रातील एक नामवंत कवी आणि समीक्षक असून त्यांचे या आधी ‘उरल्या सुरल्या जगण्याचे रिमिक्स’ हा कवितासंग्रह तर ‘राजन गवस यांचे कथात्म साहित्य’, ‘कोकणातील कृषी संस्कृती आणि लोकगीते’,‘समकालीन कविता सांस्कृतिक परिप्रेक्ष’ इत्यादी महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित आहेत.
सुन्नतेचे सर्ग या कवितासंग्रहात त्यांनी समकालीन सामाजिक जीवनातील परिवर्तनावर मार्मिक भाष्य केले आहे. सर्वसामान्य माणसांच्या समोर उभे असलेल्या प्रश्नाला त्यांनी कवितेच्या माध्यमातून वाचा फोडलेली दिसते. त्यांचे हे योगदान विचारात घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या आधी त्यांना राजर्षी छत्रपती शाहू साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.
धम्मपाल रत्नाकर साहित्य पुरस्कार वितरण करताना व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ. माणिकराव साळुंखे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, समीक्षक रवींद्र ठाकूर, रफिक सुरज, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळ, तसेच पत्रकार विजय चोरमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीपक बोरगावे, कविता मुरूमकर, केशव देशमुख, कविता ननावरे या मान्यवर कवीनाही पुरस्कार देण्यात आले. काजरेकर यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष डी. बी. वारंग तसेच गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वर्ग आणि मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.