You are currently viewing “शासन आपल्या दारी” अभियाना अंतर्गत कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा – के. मंजूलक्ष्मी

“शासन आपल्या दारी” अभियाना अंतर्गत कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा – के. मंजूलक्ष्मी

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३० तारखेला सावंतवाडीत कार्यक्रम

सावंतवाडी

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्ह्यात ३० मे ला होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल खाते प्रमुखांची व विभाग प्रमुखांची येथील तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, जगदीश काटकर, ऐश्वर्या काळुसे यांच्यासह तहसीलदार, प्रमुख विभागप्रमुख उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी सर्वांचे स्वागत करुन अभियानाविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत लाभार्थ्यांची माहिती द्यावी. प्रत्येक विभागाचा स्टॉल असावा. तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी याबाबत सर्व विभागांशी समन्वय करावा. आरोग्य विभागाने कार्यक्रम स्थळी आरोग्य कक्ष उभारावा. रुग्णवाहिका, आरोग्य पथक ठेवावे. त्याचबरोबर उन्हाची तीव्रता लक्षात घेवून पाणी व्यवस्था, ज्येष्ठ, दिव्यांग यांच्यासाठी योग्य सुविधा करावी.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर म्हणाले, लाभार्थ्यांसाठी एस टी ची सुविधा करावी. लाभार्थ्यांची संख्या, त्यांची सविस्तर माहिती, योजना याबाबतची माहिती संबंधित विभागांनी द्यावी. त्यावर लक्ष केंद्रित करावे. मुख्यालय सोडू नये

मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे नियोजन काटेकोरपणे सर्व विभागांनी करावे. अवधी कमी असल्याने शनिवार-रविवारीही याबाबत कृतिशील रहा. सुट्टीच्या कालावधित कोणीही मुख्यालय सोडू नये, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 10 =