You are currently viewing माती माती माती….

माती माती माती….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*माती माती माती…..*

“ मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन”

“रक्तामध्ये ओढ मातीची” इंदिरा संतांची खूप छान
कविता आहे ती मला आठवली. खरंच, माणूस मातीतून
येतो व शेवटी मातीतच समर्पित होतो. किती महान आहे
हो माती!

परवा एके ठिकाणी एक वादविवाद चालू होता,नि बायको
म्हणाली”माझ्या आयुष्याची पार माती केलीस तू ! खरंच
का हो माती इतकी तुच्छ आहे? का बोलतो आपण माती
विषयी असे ? खरेतर माती इतके महान कोणीच नाही.

इंदिरा संत म्हणतात..
”रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन…

कवयित्रि संत म्हणतात, माणसाच्या रक्तालाच मातीची
ओढ असते व मातीशिवाय माणसाचे जीवनच अपुरे आहे.
किती खरे आहे हे! आणि आपण खुशाल म्हणतो, माझ्या
आयुष्याची माती केलीस तू? अरेरे! माती इतकी महान
असतांना अशी दूषणे द्यावी तिला? शोभते का हो आपल्याला?

मी ४/५ वर्षांची असतांनाची गोष्ट. फारसे काही कळत नव्हते तेव्हा.
पण मातीत झेंडूच्या कोरड्या पाकळ्या चुरडल्या की सुंदर
फुलांचे लाल पिवळे गेंद येतात हे मात्र मला माहित होते. मग
मी आमच्या मागच्या दारी ६ फुट भिंतीचे कंपाऊंड होते नि
त्याच्या मागे पांढरी म्हणजे शेती होती. मागच्या दारी शेवटी
१४ बाय १४ जागेत ओपन स्पेस पण शहाबादी फरशी बसवलेली होती. मग मी झेंडू पिकवणार कसा? मातीची
जमिनच नव्हती नि माती शिवाय झेंडू येणार कसा? मग मी
शक्कल लढवली व बादल्यांनी गल्लीला वळसा घालून
पांढरीतून माती आणून मागच्या फरशीवर तिचा ढिग करू लागले.
माझ्या या रिकामट्या उद्योगाला आईने मुळीच विरोध केला
नाही. नाही तर आज मी हे लिहू शकले असते का? चांगला
सात ते आठ इंच उंचीचा मस्त चौथरा केला मी. नि त्यात
झेंडूची माळ चुरडून कालवली व मस्त बादलीने हळू हळू ती माती
पूर्ण भिजवून टाकली. रोज सकाळी उठले की पाणी शिंपडायचा उद्योग चालू ठेवला. मला वाटते(आता आठवत नाह) पण धणे व झेंडू उगवायला उशिर लागतो. अकराव्या
बाराव्या दिवशी त्यातून कोंभ येतात.

मग काय? एके दिवशी सकाळी सकाळी नाजुक सुकलेल्या
पाकळ्यांमधून इवली इवली नखा एवढी रोपे आलेली पाहून
माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. आता तुमच्यासाठी
लिहितांनाही परकरातली ती मी मला साक्षात दिसते आहे व
पुन्हा त्याचा अनुभव घेते आहे इतका तो प्रसंग ताजा आहे.
आता दररोज एकच उद्योग दर दिवशी वाढणारी ती रोपे बघणे
व त्यांना पाणी घालणे. सृजन मग ते कोणतेही असो, ते बघण्यात केवढा आनंद असतो नाही का? आणि काय?
बघता बघता त्या झाडांना चिमुकल्या कळ्या आल्या! वा रे!
वा! त्या कळ्या बघण्यात केवढा आनंद! मग त्या फुगू लागल्या, अंगोपांगी भरू लागल्या नि एक दिवस त्या पाकळ्या
फुल होऊन माझ्याकडे पाहून हसू लागल्या नि मी मंत्रमुग्ध
होऊन अनिमिष नेत्रांनी त्यांना डोळ्यात साठवू लागले. सृजन
झाले होते, नविन काही अति सुंदर असे जन्माला आले होते.
अत्यंत देखणी अशी ती फुलं माझ्याकडे पाहून वाऱ्याच्या
झुळुकेसरशी डुलत होती हसत होती आनंद वाटत होती.

केवढा चमत्कार हो! सृजन, नव निर्माण! माझे हे फक्त एकच
उदाहरण मातीचे महत्व पटवून द्यायला पुरेसे आहे. मला वाटते
जास्त भाष्य करण्याची गरज नाही. आमच्या पुढच्या अंगणात
एक कसलेसे छोटे झाड होते व त्याला पिंजरा होता गुरांनी खाऊ नये म्हणून. तिथे चुकून कारल्याच्या बिया पडल्या असाव्यात बहुधा. मग काय ? आली ना पाने करवती सारखी
सुंदर आकाराची नि झाडाच्या आधाराने वेल वाढीस लागली
सुद्धा! पुन्हा तोच उद्योग, रोज बघणे, किती वाढली. पाणी घालणे. आणि एक दिवस सुंदर पिवळ्या फुलांनी वेल लघडली नि लागल्या की कारल्याच्या बारीक कळ्या!
काय सांगू तुम्हाला, आता ही किती आनंद होतोय हो मला
लिहितांना, ते मातीचे अंगण ते पिंजऱ्यातले झाड व त्या
नाजुक कारल्याच्या कळ्या मला दिसताहेत हो डोळ्यांसमोर!
अहाहा! काय सुंदर दिवस होते हो ते..!

अन् म्हणे, माझे आयुष्य मातीमोल केले? माती आयुष्याला
मोल देते हो! मातीमोल नाही करत! माती इतके थोर क्वचितच
कुणी असेल! माती नसेल तर आपण एक दिवस ही जगू शकत
नाही. माती ने दिले नाही तर तुम्ही खाणार काय? दगड?
माती पिकते, सोसते, ऊन वारा पाऊस तिला झोडपतो तरी
मुळे घट्ट धरून ठेवते तेव्हा कुठे धनधान्य, भाजीपाला,फुलेफळे
आपल्याला मिळतात हो? नाही तर काय खाल तुम्ही? नोटा
आणि सोने? नाही, खायला भाकरीच लागते नि ही माय मातीच
ती आपल्याला देते. ह्या मातीचे ऋण तुम्ही कधीच, शतजन्म
घेऊनही तुम्ही फेडू शकत नाही इतके प्रचंड उपकार तिचे
आपल्यावर आहेत. अहो, शेवटी तुमचे अनंत अपराध पोटात
घेऊन तुम्हाला पोटाशी मातीच्या उबदार पांघरूणात झोपवणारी व तिन चिमट्या राख ही स्वत:त बेमालूमपणे सामावून घेणारी तिच आहे हे लक्षात ठेवा. अहो, धान्य ही तिच
देते व पाणी ही तिच देते. उन्हाळ्यात आमची भात नदी आटली की आई मातीची छोटी घागर घेऊन मला नदीवर पाठवत असे.

वरती वाळू, नदी कोरडी. मग हाताने वाळू बाजुला सारून
एक गोल खड्डा करायचा,हळू हळू कोरायचा, वाळू बाजुला
सारायची की जमिनीतून हलके हलके पाणी झिरपत वर
यायचे व छोटे तळे बनायचे. ते स्थिर होताच गढूळ पाणी
खाली बसून नितळ पाणी वर यायचे मग ते वाटीने मटक्यात
भरायचे. नाही हो, तुम्ही निसर्गाची तुलनाच करू शकत नाही
कुणाशी! त्यांचे देणेच अफाट आहे अफाट!
विहिरी खोदा, खोल खोल जा.. पाणी मिळणार म्हणजे
मिळणार.मागच्या वर्षी आम्ही अंगणात बोअरवेल केली.
३२० फुटांवर एक इंच पाणी लागले. लगेच मोटर बसवली.
पाणी टंचाई दूर झाली. बाहेर धुणे भांड्यांना ते पाणी आम्ही
वापरतो.आमच्या शेजारीच खेटून मात्र ४० फुटांवर दीड इंच
पाणी लागले. नशिब अपना अपना! कशाला डोके आपटायचे?
मिळाले ना एक इंच पाणी? बस्स!

कोट्यधिश असो वा अब्जाधीश असो वा संगमरवरी महालात
राहणारा असो, त्याच्या घराचा व दहा मजली इमारतीचा पाया
ही जमिनच मातीच धरून ठेवते व त्याला एकतर टेरेसवर
माती न्यावी लागते किंवा खाली जमिनीवर यावे लागते तरच
त्याची फुलबाग फुलते.आम्ही ८३ ला आमच्या नव्या घरात
रहायला आलो. काळीभोर माती. खोटे वाटेल तुम्हाला, कमरे एवढा झेंडू व डोक्या एवढी सूर्यफुले वाढली. लोक आत यायचे
बघायला. असा एवढा झेंडू मी नंतर कधीच पाहिला नाही. मला त्या झाडांना आधाराला बांबू उभे करावे लागले होते.कारण त्यांना त्यांचे वजन पेलवत नव्हते.आता आंब्याची दोन झाडे दरवर्षी भरपूर हापूस देतात.७३ ला भाड्याच्या
दोन खोल्यांच्या इवल्या जागेतल्या मुठभर अंगणात देखील मी
सूर्यफूल काकडी गिलके पपई तोंडली(तार कंपाऊंडला वेल)
काय काय पिके काढली.माती किती थोर आहे हो.!

प्राणी कुत्री मांजरी आपली विष्ठा झाकून टाकतात. कल्पना करा त्यांनी असे केले नसते तर? गाई म्हशींचे शेण व विष्ठा,
काडी कचरा मातीत गाडले की त्याचे होते “सोनखत”
व उत्तम असे गांडुळखत. जे वाया जाते ते ही दामदुपटीने खत
म्हणून ती परत करते व झाडे जोमाने वाढून आपली सर्व सेवा
करतात. ह्या मातीने जर मुळे धरून ठेवली नाहीत ना? क्षणात
वाळवंट होईल जगाचे मग तुम्ही कुठे तोंड लपवाल? नाही हो
नाही, माती सारखे कोणीच नाही. खनिजां पासून ते हिऱ्या पर्यंत तीच आपल्याला देते. सोने ही मातीतूनच काढता ना?
किती बोलू हो या माती विषयी! आमच्या लहानपणी आम्ही
ठेचकाळून पडताच माती हातात घेऊन तिच्यातले खडे बाजूला
करून खालची माती आम्ही जखमेवर टाकत होतो खरे वाटेल
तुम्हाला? (हो, पण तुम्ही आजकाल असे करू नका बरं, लोक
मारतील मला)आमचा जमाना गेला. जे घडले ते सांगितले तुम्हाला..! ह्या माती विषयी किती ही बोलले तरी माझे समाधान होणार नाही, म्हणून थांबते.

“माती चंदन नि बुक्का, रोज लावावी कपाळी
माथा टेकवावा रोज, मोल उतरू द्या गळी”

ह्या आताच लिहिलेल्या ओळींनी माथा टेकवून आपला
निरोप घेते.. बरंय् मंडळी..लोभ असू द्या !

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २१ मे २०२३
वेळ : संध्या ७ : ५१

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा