You are currently viewing ख्यातनाम समीक्षक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.किशोर सानप यांचे नागपूर येथे निधन

ख्यातनाम समीक्षक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.किशोर सानप यांचे नागपूर येथे निधन

 

महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील समीक्षा क्षेत्रातील मोठे नाव असलेले व विदर्भ साहित्य संघाच्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आमचे मित्र प्रा. डॉ. किशोर सानप आज आपल्यात नाहीत. आज रविवार दि.21 मे रोजी सकाळी 11 वा.त्यांचे नागपूर येथे वयाच्या 67 व्या वर्षी दुःखद निधन झाले. प्रामाणिकपणे स्पष्टपणे समीक्षा करणारे जे काही मोजके समीक्षक महाराष्ट्रमध्ये आहेत त्यात प्रा. डॉ. किशोर सानप यांचा समावेश आहे. किशोरचा माझा अनुभव खूप जुना .तो अमरावतीला आल्यापासून. त्याचे काका अमरावतीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निदेशक म्हणून काम करीत होते आणि किशोरचे वडील व इतर सदस्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात असलेल्या उपाहारगृहाचे कामकाज पाहत होते. एक दिवस एक मुलगा श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयांमध्ये माझ्याकडे आला. एम ए मराठीचे गॅझेट आपल्याकडे आलेले आहे काय ? असे त्याने मला विचारले. मीही मराठीचा प्राध्यापक असल्यामुळे आणि तेव्हा मराठीमध्ये एम ए करणाऱ्यांची संख्या बरीच कमी असल्यामुळे मी कुतूहलाने त्याला त्याचे नाव विचारले. त्याने सांगितले मी किशोर सानप .मूळचा वर्ध्याचा. माझे वडील येथे आय टी आय मध्ये कॅन्टीन चालवितात काका आयटीआयमध्ये निर्देशक आहेत. किशोरचा परिचय झाला तो असा. तो राहायचा आयटीआय कॉलनीमध्ये .माझे कॉलेज ओलांडूनच त्याला आयटीआय परिसरात जावे लागत होते .त्यामुळे आमच्या भेटीगाठी वाढल्या .आमची साहित्य संगम ही संस्था तेव्हा डॉ. मोतीलाल राठी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत होती. किशोर त्यामध्येही सहभागी झाला. काहीतरी वेगळेपण त्याच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये तेव्हाही होते. त्याचा आवाज करारी होता. त्याची मांडणी मुद्देसूद होती आणि त्याची सामाजिक बांधिलकी त्याने आयुष्याच्या शेवटपर्यंत जोपासली. संत तुकाराम महाराजांवर त्यांनी जे संशोधन केले. त्याला तोड नाही .त्यामुळे संत साहित्याच्या क्षेत्रात प्रा डॉ. आ.ह. साळुंखेसरांबरोबर दुसरे नाव संत तुकाराम महाराजांच्या संदर्भात प्रा. डॉ.किशोर सानप यांचे नाव घ्यावे लागत होते. किशोरचे लेखनकार्य वागणं आगळे वेगळे.वडिलांना कॅन्टीनमध्ये तो मदत करायचा .आम्ही अधून मधून त्याच्या कँन्टीनवर वर हजेरी लावायचे. किशोरने पीएच.डी. साठी विजय निवडला तो भालचंद्र नेमाडे यांचा .नेमाडे तेव्हा चर्चेत होते. चांगलेच चर्चेत होते .त्यांचे काही लेखन दुर्बोध होते. या दुर्बोध लेखकाला पीएचडीसाठी जेव्हा किशोरने निवडले तेव्हा आम्ही त्याला म्हटले .कशाला आगीत पडतोस. ? पण त्याने ऐकले नाही .त्याला पीएचडी करायला नक्कीच त्रास झाला .वेळ लागला .पण तो डगमगला नाही. त्याने आपण संशोधन पूर्ण केले. एक दिवस किशोर माझ्याकडे आला. त्याने वर्ध्याला ग्रंथालय काढायचे ठरवले होते .आम्ही अमरावतीला साहित्य संगमतर्फे बबन सराडकरांच्या गाडगे नगर भागातील घरी अक्षर वाचनालय सुरू केले होते. पण ते बंद पडले होते .त्याची सर्व पुस्तके मी प्रा.डॉ. किशोर सानप व त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे मित्र डॉ गजानन तोटेवार यांच्या हवाली केले. किशोर वर्ध्याला प्राध्यापक म्हणून गेला आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला. पुढे तो वर्ध्याच्या लोक शिक्षण मंडळ लोक महाविद्यालय लोक विद्यालय या संस्थेत पदाधिकारीही म्हणून काम करायला लागला .आठवणीने तो त्याच्या संस्थेत मला व्याख्यानाला बोलवित होता .आणि मी पण माझा वर्धा भागात कार्यक्रम असला तर त्याला त्रास द्यायला कमी केले नाही. पुढे आम्ही बहुजन साहित्य परिषद स्थापन केले .प्रा. डॉ.विठ्ठल वाघ प्रा. डॉ.मधुकर वाकोडे नारायण सुर्वे प्रा.फ.मु.शिंदे प्रा. डॉ.श्रीकांत तिडके बबन नाखले मनोज तायडे असे कितीतरी मित्र एकत्र आले. त्या चळवळीतही किशोर आमच्याबरोबर होता .त्याने शेवटपर्यंत आमची साथ सोडली नाही .मध्यंतरी किशोर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभा राहिला. प्रकृती साथ देत नव्हतीच . प्रा. श्रीकृष्ण राऊत व प्रा. डॉ.किशोर सानप यांना तब्येतीने साथ दिली नाही .पण त्यांचा आत्मविश्वास प्रचंड होता. किशोर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उभा राहिला. प्रकृती बरी नसतानाही तो पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेर फिरला .सगळ्या सदस्यांना भेटला. त्यात त्याचे लाखो रुपये खर्चही झाले. पण अध्यक्षपदाची माळ त्याच्या गळ्यात काही पडली नाही .ती जरी पडली नसली तरी साहित्याच्या क्षेत्रात किशोरने मैलाचा दगड म्हणून आपली नोंद केली आहे .रहे ना रहे हम महका करेंगे या न्यायाने साहित्य विश्वात किशोरचे नाव दरवळत राहणार आहे .आज त्याचे दुःखद निधन झाले .आमच्या साहित्य संगम परिवारातील बहुजन साहित्य परिवार चळवळीतील एक निष्ठावंत सामाजिक बांधिलकी जोपासणारा आणि विपरीत परिस्थितीमध्ये झुंज देऊन प्रगतीपथावर पोहोचलेला किशोर आज आमच्यात नाही. पण अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती असेच म्हणावे लागेल. किशोरला माझी ही शब्दांजली.

प्रा.डाँ.नरेशचन्द्र काठोळे.

सचिव.

साहित्य संगम.

अमरावती.

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा