You are currently viewing लखनौचा कोलकात्यावर एका धावेने विजय; रिंकूचे झंझावाती अर्धशतक व्यर्थ; केकेआर स्पर्धेतून बाहेर*

लखनौचा कोलकात्यावर एका धावेने विजय; रिंकूचे झंझावाती अर्धशतक व्यर्थ; केकेआर स्पर्धेतून बाहेर*

*लखनौचा कोलकात्यावर एका धावेने विजय; रिंकूचे झंझावाती अर्धशतक व्यर्थ; केकेआर स्पर्धेतून बाहेर*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएल २०२३ च्या ६८ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा एका धावेने पराभव केला. या रोमांचक विजयासह लखनौचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणारा लखनौ हा गुजरात आणि चेन्नईनंतरचा तिसरा संघ आहे. आता मुंबई आणि आरसीबी हे चौथ्या स्थानाचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, हे दोघेही हरले तर राजस्थानचा संघही नशिबाच्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने निकोलस पूरनच्या अर्धशतकाच्या जोरावर आठ विकेट्सवर १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघ रिंकू सिंगच्या नाबाद ६७ धावांच्या जोरावर १७५ धावाच करू शकला. गोलंदाजीत कोलकाताकडून वैभव, शार्दुल आणि नरेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी लखनौकडून रवी बिश्नोई आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्‍या लखनौ संघाची सुरुवात खराब झाली. संघाची पहिली विकेट १४ धावांवर पडली. करण शर्माला वैयक्तिक तीन धावांवर हर्षित राणाने बाद केले. यानंतर प्रेरक मंकड आणि क्विंटन डिकॉक यांनी चांगली भागीदारी करत संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. पॉवरप्लेमध्ये लखनौने ५४ धावा केल्या. यानंतर प्रेरक २६ धावा करून वैभव अरोराचा बळी ठरला. स्टॉइनिसही दोन चेंडूंनंतर बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. लखनौचा संघ ५५ धावांवर तीन गडी गमावून संघर्ष करत होता. अशा स्थितीत कर्णधार क्रुणालने डिकॉकसह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तोही नऊ धावा करून बाद झाला. काही वेळाने डिकॉकही वैयक्तिक २८ धावांवर तंबूमध्ये परतला आणि लखनौची धावसंख्या ७३/५ झाली. यानंतर आयुष बडोनी आणि निकोलस पूरन यांनी डावाची धुरा सांभाळत सहाव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. यादरम्यान पूरणने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. बडोनी १८व्या षटकात २५ धावा काढून बाद झाला. यानंतर पूरणही ५८ धावांवर तंबूमध्ये परतला. शेवटी कृष्णप्पा गौतमने लखनौची धावसंख्या १७६ धावांवर नेली. कोलकाताकडून वैभव अरोरा, शार्दुल ठाकूर आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीला प्रत्येकी एक विकेट मिळाली. कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने या सामन्यात आठ गोलंदाजांचा वापर केला. यापैकी तिघांनी षटकामागे १० पेक्षा जास्त धावा दिल्या.

१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली. जेसन रॉय आणि व्यंकटेश अय्यर यांनी दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या ३० धावांपर्यंत नेली. कोलकाता संघाने पाच षटकांत ५९ धावा केल्या होत्या. यानंतर कृष्णप्पा गौतमने व्यंकटेश अय्यरला २४ धावांवर बाद केले. कोलकाताने पॉवरप्लेमध्ये एक गडी गमावून ६१ धावा केल्या. यानंतर नितीश राणाही आठ धावा करून रवी बिश्नोईचा बळी ठरला. पुढच्याच षटकात क्रुणाल पंड्याने जेसन रॉयला बाद केले. रॉयने २८ चेंडूत ४५ धावा केल्या. गुरबाजसह रिंकू सिंगने संघाची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. यानंतर गुरबाजही मोठा फटका खेळून बाद झाला. त्याने १० चेंडूत १५ धावा केल्या. यानंतर रवी बिश्नोईने आंद्रे रसेलला सात धावांवर तंबूमध्ये पाठवून लखनौचा विजय जवळपास निश्चित केला. शार्दुल ठाकूर तीन तर सुनील नरेन एका धावेवर बाद झाला. रिंकू सिंगने १९व्या षटकात २० धावा देत आशा उंचावल्या. दरम्यान, त्याने २७ चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले, मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेरीस, कोलकाता संघ १७५ धावा करू शकला आणि सामना एका धावेने गमावला. रिंकू सिंगने ३३ चेंडूत ६७ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २१ धावांची गरज होती. या षटकात रिंकूने १९ धावा काढल्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. लखनौकडून रवी बिश्नोई आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. क्रुणाल पांड्या आणि कृष्णप्पा गौतमला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

उद्या साखळी सामन्यांची सांगता होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडिअन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी ३:३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहचणार हे आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातल्या सामन्यांतर स्पष्ट होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्सचे ह्या मोसमातले भवितव्य या दोन्ही सामन्यांवर अवलंबून आहे.

केकेअारचा ह्या मोसमातील प्रवास संपला. रिंकू सिंगने १४ सामन्यांत संघासाठी ४७४ धावा काढल्या. त्यात चार अर्धशतकं झळकावली.

निकोलस पूरनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा