देवगड
शासन आपल्या दारी अभियानातंर्गत देवगड तालुक्यातील इंद्रप्रस्थ हॉल डायमंड हॉटेलच्या मागे सातपायरी येथे गुरुवार दि. २५ मे ला सकाळी १० ते सायं.५ या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील यांनी केले आहे.
महिला व बालविकास विभागाकडील शासन निर्णयनुसार राज्यातील महिलांकरिता शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करुन देण्याच्य अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर हा महिला विशेष कार्यक्रम राबविण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शिबीरातून तालुकास्तरावरील सर्व शासकीय विभागांचा सहभाग असणार आहे. सर्व विभागाचे प्रमुख या शिबीरास उपस्थित राहून महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे विहित मुदतीत निरसन करणार आहेत. शिबीरामध्ये सर्व शासकीय विभागाचे स्टॉल्स उभारुन सदर स्टॉल्समध्ये संबंधित विभागांच्या योजनांचे बॅनर्स, भित्तीपत्रके, माहितीपुस्तके, घडीपुस्तिका पोस्टर्स इ. असणार आहेत. प्रत्येक स्टॉलमध्ये संबंधित विभगाचे किमान दोन अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून शिबीरामध्ये येणाऱ्या महिलांना संबंधित विभागांच्य योजनांची माहिती देणार आहेत.