मालवण
भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी मसुरे गावाला भेट देऊन रमाई नदीपात्राची पाहणी केली. डिझेलच्या निधी अभावी येथील गाळ उपशाचे काम आठ दिवस बंद आहे, हे काम तात्काळ सुरु करण्याची ग्वाही देतानाच डिझेल साठीचा सहा कोटींचा निधी उद्या तात्काळ अदा केला जाईल. निधी अभावी येथील कुठलेच काम रखडणार नाही, असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले. राज्यात शिवसेना – भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे सरकार आमचं आणि प्रशासन देखील आमचंच आहे. उद्या कोणतरी इथे येऊन तुमची दिशाभूल करील. त्याच्यामागे फरफटत जाऊ नका, भाजपच्या माध्यमातून तुमची कामे होत आहेत. त्याचा रिझल्ट देखील गावातून दाखवून द्या, असे आवाहन निलेश राणे यांनी यावेळी केले.
मसुरे गावातून वाहणाऱ्या रमाई नदी मधील गाळ उपशाचे काम डिझेल साठी निधी नसल्याने गेले आठ दिवस बंद होते. याबाबत माजी जि.प. अध्यक्ष सौ. सरोज परब, माजी पं. स. सदस्य महेश बागवे यांनी भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. याची तातडीने दखल घेत त्यांनी मसुरे देऊळवाडा येथे भेट देत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी देऊळवाडा प्राथमिक शाळा येथे बोलताना निलेश राणे म्हणाले, मसुरे गाव हा केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांचा आवडता गाव आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे विकास कामाना निधी कमी पडणार नाही. परंतु विकास कामे आम्ही करणार आणि श्रेय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. इथले नाव घेण्या इतके मोठे नसलेले पुढारी तुमची कामे करून देतो म्हणून सांगतील पण त्यांच्या कडून ते होणार नाही. या भागातील प्रलंबित विकासकामे पूर्ण होण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे ते म्हणाले.