You are currently viewing दिल्ली कॅपिटल्सच्या विजयामुळे आरसीबी आणि मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग सोपा

दिल्ली कॅपिटल्सच्या विजयामुळे आरसीबी आणि मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग सोपा

पंजाब किंग्जच्या १५ धावांनी पराभवासह प्लेऑफचं स्वप्न उध्वस्त

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएल २०२३ च्या ६४ व्या सामन्यात दिल्लीने पंजाब किंग्जचा१५ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे पंजाबसाठी प्लेऑफची शर्यत कठीण झाली आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २ बाद २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ आठ गडी गमावून केवळ १९८ धावा करू शकला आणि सामना गमावला. या मोसमात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर दिल्लीचा संघ इतर संघांचा खेळ खराब करत आहे.

दिल्लीकडून रिले रुसोने सर्वाधिक नाबाद ८२ धावा केल्या. त्याच्याशिवाय पृथ्वी शॉनेही ५४ धावांची खेळी खेळली. डेव्हिड वॉर्नरने आणि फिलिप सॉल्टने २६ धावा केल्या. पंजाबकडून सॅम करणने दोन बळी घेतले. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक ९४ धावा केल्या. त्याचवेळी अथर्व तायडेने ५५ धावांची खेळी केली. दिल्लीकडून नॉर्टजे आणि इशांतने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पंजाबच्या पराभवामुळे मुंबई आणि आरसीबीसाठी प्लेऑफची शर्यत सोपी झाली आहे. आता या दोन्ही संघांना त्यांचे उर्वरित सामने जिंकायचे आहेत आणि यापैकी एका संघाने प्लेऑफ खेळायचे हे निश्चित केले जाईल. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आता चेन्नई, लखनौ, मुंबई आणि आरसीबी या तिन्ही स्थानांसाठी सर्वात मजबूत दावा आहे. राजस्थान, कोलकाता आणि पंजाब हे संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत, मात्र या संघांना त्यांच्या नशिबावर अंतिम चारमध्ये स्थान मिळवता येणार आहे.

शिखर धवनने नाणेफेक जिंकून संध्याकाळी पडणारे दव लक्षात घेऊन दिल्लीला फलंदाजी करण्यास सांगितले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी या सामन्यात दिल्लीला सुरुवात करून दिली जी त्यांना या आयपीएलमध्ये आतापर्यंत मिळाली नव्हती. पॉवरप्लेमध्ये वेगवान फलंदाजी करताना दोघांनी ६१ धावा जोडल्या. या काळात वॉर्नरने १८ चेंडूत ३४ धावा केल्या. राहुल चहरने ३९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर वॉर्नरचा झेल सोडला, पण त्याने त्या संधीचा फायदा करून घेतला नाही. वॉर्नरला सॅम करनने ४६ धावांवर बाद केले. धवनने त्याचा अप्रतिम झेल घेतला. त्याने ३१ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. वॉर्नर आणि शॉ यांनी ६२ चेंडूत ९४ धावांची या मोसमातील सर्वात मोठी सलामीची भागीदारी केली. रिले रुसोने वॉर्नरची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. त्याने येताच दोन चौकार मारले. यानंतर कागिसो रबाडाच्या १३व्या षटकात त्याने दोन षटकार आणि चौकार लगावले. यानंतर शॉने या आयपीएलमधील आपले पहिले आणि एकूण १३वे अर्धशतक ३६ चेंडूत पूर्ण केले. दोघांनीही झटपट अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली, ज्यामध्ये रुसोचे योगदान ४५ धावांचे होते. दरम्यान, शॉ ३८ चेंडूत ५४ धावा करून करणचा बळी ठरला. रुसोने आयपीएलमधील पहिले अर्धशतक २५ चेंडूत पूर्ण केले. रुसोच्या ३२ चेंडूंत ८७ धावांच्या जोरावर दिल्लीने २ बाद २१३ धावा केल्या. रुसौने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. या मोसमात दिल्लीचा संघ प्रथमच २०० हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला. या स्पर्धेत २०० धावांचा टप्पा पार करणारा दिल्ली हा शेवटचा संघ ठरला आहे. या सामन्यात पंजाबकडून सॅम करणने दोन्ही विकेट घेतल्या. सॅम करण आणि राहुल चहर व्यतिरिक्त पंजाबच्या सर्व गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट १० पेक्षा जास्त होता.

२१४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या षटकात एकही धाव झाली नाही आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार शिखर धवनला इशांत शर्माने बाद केले. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच कर्णधार गमावल्याने पंजाबचा संघ संघर्ष करत होता. अशा स्थितीत प्रभसिमरनने अथर्व तायडेसोबत ५० धावांची भागीदारी करत सामन्याचा ताबा घेतला. यानंतर प्रभसिमरन सिंगला २२ धावांवर अक्षर पटेलने बाद केले.

दिल्लीला विकेट्स घेण्याच्या अधिक संधी होत्या, मात्र क्षेत्ररक्षणातील खराब कामगिरीमुळे या संघाला विकेट घेता आल्या नाहीत. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर लियाम लिव्हिंगस्टोन आणि अथर्व तायडेचे सहजसोपे झेल एनरिच नॉर्टजे आणि यश धुल यांनी सोडले. याशिवाय दोघांना धावबाद करण्याची संधीही सोडली. या जीवदानाचा फायदा घेत लिव्हिंगस्टोन आणि अथर्वने तिसऱ्या विकेटसाठी ७८ धावा करत सामन्यात तग धरली. यादरम्यान अथर्वने ३८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अथर्व तायडे ४२ चेंडूत ५५ धावा करून निवृत्त झाला आणि जितेश शर्मा फलंदाजीला आला. अथर्वच्या संथ फलंदाजीमुळे पंजाबचा धावगती निश्चितच षटकामागे १८ धावांच्या जवळ गेली. अशा स्थितीत जितेशने तिसऱ्या चेंडूवरच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो खाते न उघडता तंबूमध्ये परतला. यानंतर लिव्हिंगस्टोनने ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तोपर्यंत पंजाबचा संघ सामन्यात खूपच मागे पडला होता. धावगतीच्या दबावाखाली शाहरुख खानही सहा धावा करून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. सॅम करन आणि लिव्हिंगस्टोन यांनी पंजाबची धावसंख्या १८व्या षटकात १७६ धावांपर्यंत नेली. अशा स्थितीत पंजाबचा संघ हा सामना जिंकू शकेल असे वाटत होते, पण नॉर्टजेने १९व्या षटकात सॅम करनला त्रिफळाचीत केले. करणने पाच चेंडूत ११ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर लिव्हिंगस्टोनला स्ट्राइक देण्याच्या प्रयत्नात हरप्रीत ब्रार धावबाद झाला. यानंतर पुढील तीन चेंडूंमध्ये लिव्हिंगस्टोनला केवळ एक धाव करता आली. येथूनच पंजाबचा पराभव निश्चित झाला, कारण शेवटच्या षटकात ३३ धावा करणे जवळपास अशक्य होते. शेवटच्या षटकात इशांत शर्माने १७ धावा दिल्या आणि पंजाबचा संघ आठ गडी गमावून १९८ धावाच करू शकला. लियाम लिव्हिंगस्टोनने ४८ चेंडूत ९४ धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि एनरिच नॉर्टजे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. खलील अहमद आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

रिले रुसोला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा