मालवण :
मालवण मच्छीमार्केट येथील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी भेट देऊन येथील परिस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मच्छी मार्केट परिसरात नियमितपणे कचऱ्याची गाडी येत नसल्याने येथील पोल्ट्री व्यावसायिक कचरा उघड्यावर फेकून देतात. यामुळे दररोज दुपारी दीड ते दोन या वेळेत मच्छीमार्केट परिसरात कचऱ्याची गाडी येण्यासाठीचे नियोजन यावेळी करण्यात आले. तसेच सायंकाळच्यावेळी जमा होणारा पोल्ट्री व्यवसायिकांचा कचरा एकत्र करण्यासाठी सौरभ ताम्हणकर यांनी स्वखर्चातून दोन मोठे डस्टबिन उपलब्ध करून दिले आहेत.
परिसरातील पोल्ट्री व्यावसायिक आणि मच्छी विक्रेते यांनीही परिसर स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन सौरभ ताम्हणकर यांनी केले आहे.
मालवण मच्छी मार्केट नजीकचा परिसर दुर्गंधीने ग्रस्त बनला आहे. या परिसरात पालिका कचरा गाडी वेळेत येत नसल्याने पोल्ट्री व्यवसाय करणारे विक्रेते आपल्याकडील ओला कचरा आणि कोंबड्याची पिसे किनारपट्टीवरच फेकून देत असल्याने या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची भीती आहे. मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. अशावेळी किनाऱ्यावरील कचऱ्यामुळे मालवणच्या पर्यटनाचीही बदनामी होत असून यातून मार्ग काढण्यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी पुढाकार घेऊन नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी निखिल नाईक आणि मंदार केळुसकर यांच्या समावेत या ठिकाणी भेट दिली. यावेळी परिसरातील अस्वच्छता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी नागरिकांनीही कचऱ्याची समस्या प्रखरपणे नगरपालिका अधिकाऱ्यांसमोर मांडली. या ठिकाणी पोल्ट्री व्यावसायिकांचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने या व्यवसायिकांशी चर्चा करण्यात आली. यावेळी कचरा गाडी नियमितपणे येथे येत नसल्याची तक्रार व्यावसायिकांनी मांडली. नगरपालिकेची कचरा गाडीच नियमित येत नसेल तर व्यावसायिकांनी कचरा टाकायचा कुठे ? असा सवाल सौरभ ताम्हणकर यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी सर्वानुमते दररोज दुपारी दीड ते दोन या वेळेत कचऱ्याची गाडी मच्छी मार्केट परिसरात कचरा उचलण्यासाठी दाखल होईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी सायंकाळचा कचरा कुठे टाकायचा याबाबत प्रश्न निर्माण झाला असता सौरभ ताम्हणकर यांनी तातडीने स्वखर्चातून येथे दोन मोठ्या डस्टबिन उपलब्ध करून दिल्या. मत्स्य विक्रेते आणि पोल्ट्री व्यवसायिकांनी सायंकाळच्या वेळेचा आपल्याकडील कचरा या डस्टबिनमध्ये टाकावा. त्यानंतर दररोज स्वच्छता विभागाचे कर्मचारी हा कचरा गोळा करतील, असे यावेळी ठरविण्यात आले.
परिसरातील व्यावसायिकांनी यावेळी मच्छीमार्केट मधील शौचालयाच्या अस्वच्छतेकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या ठिकाणी नियमितपणे साफसफाई केली जात नाही. तसेच गटारांच्या साफसफाईकडेे देखील दुर्लक्ष केले जात आहे. याकडे संबंधितानी लक्ष वेधले असता यावर तात्काळ उपायोजना केल्या जातील, अशी ग्वाही स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, पालिका प्रशासन परिसर स्वच्छतेसाठी सहकार्याची भूमिका दाखवत असेल तर स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनीही स्वतःची जबाबदारी ओळखून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांनी यावेळी केले.