बांदा
मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे कॅन्टर चालकाचा चालत्या गाडीत हृदयावीकराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी उशिरा घडली. सचिन संभाजी भोईटे (वय ४८ रा. तळवडे जिल्हा सातारा) असे मृत चालकाचे नाव आहे.
बांदा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेला. याबाबत सविस्तर माहिती अशी की सचिन भोईटे हे आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन खाजगी कंपनीची मालवाहतूक मुंबईहून गोव्याच्या दिशेने करत होते. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांनी सावंतवाडी शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार केलेत. दुपारी त्यांना बरे वाटू लागल्याने ते पुन्हा गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झालेत. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे त्यांच्या ताब्यातील कॅन्टर आला. मात्र बराच वेळ कॅन्टर याठिकाणी उभा होता.
भोईटे हे मोबाईल उचलत नसल्याने गोव्यातून खाजगी मालवाहतूक कंपनीची माणसे त्यांच्या शोधार्थ बांदा येथे आलीत. त्यांना इन्सुली तपासणी नाका येथे कॅन्टर उभा असलेल्या स्थितीत आढळला. तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी याची कल्पना दिली. कॅन्टरचा दरवाजा उघडून पाहिले असता चालक भोईटे हे मृत अवस्थेत आढळले. दरम्यान त्यांची गाडी सुरूच होती. बांदा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.