कणकवली
महसूल अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू व्यवसाय सुरू राहिला आहे. या वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची मोठी दुर्दशा होत आहे. त्याचा त्रास नागरिकांना, वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूकीविरोधात उद्या 10 नोव्हेंबरला जिल्हा मुख्यालयात आंदोलन छेडणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज दिली.
श्री.उपरकर यांनी आज येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाबाबत आम्ही वारंवार आवाज उठवला, तक्रारी केल्या. त्यानंतर महसूल विभागाने काही ठराविक रॅम्प तोडण्याची कारवाई केली. मात्र अजूनही अनेक नदी, खाड्यांमध्ये अवैध वाळू उपसा आणि अवैधपणे वाळूची वाहतूक होत आहे. अवैध वाळू वाहतूकीमुळे प्रमुख तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांना दरवर्षी खड्डे पडत आहेत. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
श्री.उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील वाळू साठ्यांचा अद्यापही लिलाव झालेला नाही. शासनाने जाचक अटी कायम ठेवल्याने लिलाव प्रक्रिया सुरू होत नाही. त्यामुळे चोरटी वाळू वाहतूक अधिकारी, कर्मचार्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. याखेरीज शासनाला देखील लाखोंच्या लॉयल्टीला मुकावे लागत आहे. याविरोधात आवाज उठविण्यासाठी उद्या मंगळवारी जिल्हा मुख्यालयात आम्ही आंदोलन करणार आहोत.