*राजस्थानने कोलकाताचा ९ गडी राखून केला दणदणीत पराभव*
*युझवेंद्र चहल आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३ च्या ५६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलच्या १६ व्या मोसमात चहलने ही कामगिरी केली. त्याने कोलकाताचा कर्णधार नितीश राणाला बाद करून ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. ब्राव्होने १८३ विकेट्स घेतल्या होत्या. ब्राव्होबद्दल बोलायचे झाले तर त्याने १६१ सामन्यात १८३ विकेट घेतल्या. त्याला मागे टाकताना चहलने १८ सामने कमी खेळले. त्याने १४३ व्या सामन्यात ही कामगिरी केली. चहल राजस्थानपूर्वी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्यही राहिला आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त ड्वेन ब्राव्हो मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्सकडूनही खेळला आहे.
कोलकाताविरुद्ध चहलने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात २५ धावा देऊन चार विकेट घेतल्या. चहलने व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांना बाद केले. चहलने आयपीएलमध्ये १४३ सामन्यांत १८७ विकेट घेतल्या आहेत.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने २० षटकांत आठ गडी गमावून १४९ धावा केल्या. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने केकेआरला सुरुवातीचा धक्का दिला. त्याने जेसन रॉयला (१०) झेलबाद केले. त्यानंतर बोल्टने गुरबाजलाही (१८) दुसऱ्याच षटकात तंबूमध्ये पाठवले. राजस्थानचे गोलंदाज एका टोकाकडून विकेट घेत राहिले, तर व्यंकटेश आपले फटके खेळत राहिला. वेंकटेशने अश्विनच्या चेंडूवर दोन षटकार मारून आपले हात मोकळे केले. राजस्थानच्या तगड्या गोलंदाजीसमोर केकेआरचे फलंदाज झुंजत होते. केकेआरने १३व्या षटकात १०० धावा पूर्ण केल्या. आसिफच्या चेंडूवर एकच धाव घेत व्यंकटेशने ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. केकेआरला व्यंकटेशकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती पण चहलच्या एका षटकाने खेळ फिरवला. डावाच्या १७व्या षटकात त्याने व्यंकटेशला बोल्टकडे झेलबाद करून यजमानांच्या आशा मोडीत काढल्या. त्याच षटकात त्याने शार्दुल ठाकूरला (१) तंबूमध्ये पाठवले. आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असलेला रिंकू सिंग या सामन्यात फार काही करू शकला नाही. तो १८ चेंडूत १६ धावा करून चहलचा बळी झाला.
प्रत्युत्तरात राजस्थानने १३.१ षटकात १ गडी गमावत १५१ धावा करत सामना जिंकला. त्यांच्यासाठी यशस्वी जैस्वालने नाबाद ९८ आणि कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ४८ धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. संघाला एकच धक्का बसला तो जोस बटलरच्या रूपाने. दुसऱ्याच षटकात तो खाते न उघडता धावबाद झाला. या विजयासह, राजस्थानने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर मजल मारली आणि शेवटच्या तीन पराभवांची मालिकाही खंडित केली. जैस्वालने १३ चेंडूत आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने ४७ चेंडूत नाबाद ९८ धावांची धडाकेबाज खेळी खेळली आणि १२ चौकार आणि पाच शानदार षटकार ठोकले. संजू सॅमसनने २९ चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावा केल्या. संजू स्वतः ४८ धावांवर खेळत असताना त्याने जैस्वालला स्ट्राइक दिली आणि षटकार मारण्याचे संकेत दिले, परंतु जयस्वाल चौकार मारण्यात यशस्वी झाला आणि शतक पूर्ण करू शकला नाही.
जैस्वालने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक शैली अवलंबली. डावातील पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या कर्णधार नितीश राणाला त्याने लक्ष्य केले. त्याने सलग चार चेंडूंत दोन षटकार आणि दोन चौकार मारले आणि नंतर शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. या षटकात त्याने २६ धावा दिल्या. पुढच्याच षटकात बटलर (०) धावबाद झाला. यानंतर तिसऱ्या षटकात जैस्वालने शार्दुलच्या चेंडूवर तीन चौकारांसह १४ धावा केल्या. मात्र, वरुण चक्रवर्तीला खेळताना त्याला थोडा त्रास झाला आणि त्याचे पाच चेंडू खेळल्यानंतर त्याला एक धाव काढता आली आणि या एका धावेने त्याने आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले. यानंतर संजूनेही दुसऱ्या टोकाकडून धावा काढल्या.
फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने चार विकेट घेत कोलकाताला मोठी धावसंख्या करू दिली नाही. कोलकाता संघ २० षटकांत आठ विकेट गमावून केवळ १४९ धावाच करू शकला. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान ४२ चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि चार षटकार मारले.
या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर यशस्वी जैस्वाल म्हणाला – मी नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जिंकलो हे छान वाटतं. मी सामन्यात बरंच काही शिकलो आणि आम्ही जिंकलो त्यामुळे माझ्या फटक्यांच्या निवडीमुळे आनंद झाला. संजू म्हणाला काळजी करू नको, बिनधास्त खेळ. त्याचाच परिणाम आमचा संघ विजयी होण्यात झाला.
*आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज*
युझवेंद्र चहल – सामने-१४३ बळी-१८७, ड्वेन ब्रावो- सामने-१६१ बळी-१८३, पीयूष चावला – सामने-१७६ बळी-१७४, अमित मिश्रा – सामने-१६० बळी-१७२, रविचंद्रन अश्विन – सामने-१९६, बळी-१७१