You are currently viewing शेवटच्या चेंडूवर षटकार मारून समदने हैदराबादला जिंकवले; संदीपचा नो बॉल ठरला खलनायक; राजस्थानचा सहावा पराभव

शेवटच्या चेंडूवर षटकार मारून समदने हैदराबादला जिंकवले; संदीपचा नो बॉल ठरला खलनायक; राजस्थानचा सहावा पराभव

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा चार गडी राखून पराभव करत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. आयपीएलच्या ५२व्या सामन्यात राजस्थानने त्यांच्या घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने अखेरच्या चेंडूवर अब्दुल समदच्या षटकाराच्या जोरावर २१७ धावा केल्या आणि सामना चार गडी राखून जिंकला. या विजयासह हैदराबादचे १० सामन्यांत आठ गुण झाले असून हा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. त्याचवेळी राजस्थानचा संघ ११ सामन्यांत १० गुणांसह चौथ्या स्थानावर असून अडचणीत दिसत आहे. पहिल्या पाचपैकी चार लढती जिंकणाऱ्या राजस्थानच्या संघाने पुढच्या सहा सामन्यांपैकी पाच सामने गमावले आहेत. या संघाला मागील तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात हैदराबादला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती आणि अब्दुल समदला संदीप शर्माने झेलबाद केले. राजस्थानच्या संघाने हा सामना चार धावांनी जिंकला होता, पण त्याचवेळी नो बॉलचा हूटर वाजला आणि सामना उलटला. समद खेळपट्टीवर राहिला आणि आता हैदराबादला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. अशा स्थितीत समदने षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि राजस्थान संघ जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वालने वेगवान धावा केल्या तर बटलरने दुसरी बाजू लावून धरली. जैस्वालच्या झंझावाती फलंदाजीमुळे राजस्थानने पॉवरप्लेच्या आत ५० धावांचा टप्पा ओलांडला. मात्र, १८ चेंडूत ३५ धावा करून जैस्वाल बाद झाला. जैस्वाल बाद झाल्यानंतर जोस बटलरने गीअर्स बदलले आणि संजू सॅमसनसह तुफानी पद्धतीने धावा केल्या. दोघांनी १० षटकांत राजस्थानची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. यानंतर बटलरने ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि संजूसोबत शतकी भागीदारी करत राजस्थानची धावसंख्या १५ व्या षटकात १५० धावांच्या पुढे नेली. यानंतर संजू सॅमसनने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डावाच्या १९ व्या षटकात बटलरला भुवनेश्वर कुमारने बाद केले आणि आयपीएलचे सहावे शतक हुकले. बटलरने ५९ चेंडूत ९५ धावा केल्या. त्याने आपल्या डावात १० चौकार आणि चार षटकार मारले आणि सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली.

शेवटी, संजू सॅमसनने झंझावाती पद्धतीने धावा करत राजस्थानची धावसंख्या २ बाद २१४ पर्यंत नेली. त्याने ३८ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या. त्याच्या खेळीत पाच षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. त्याचवेळी हैदराबादकडून मार्को जॅनसेन आणि भुवनेश्वर कुमार प्रत्येकी एक विकेट घेऊ शकले.

२१५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली. अनमोलप्रीत सिंग आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने जोरदार धावा केल्या आणि पॉवरप्लेच्या आत हैदराबादची धावसंख्या बिनबाद ५० धावा पार केली. मात्र, अनमोलप्रीत सिंग २५ चेंडूत ३३ धावा करून चहलचा बळी ठरला. यावेळी संघाची धावसंख्या ५१ धावा होती. यानंतर अभिषेकने राहुल त्रिपाठीच्या साथीने हैदराबादची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. यावेळी हैदराबादची धावगती मंदावली, मात्र नंतर दोन्ही फलंदाजांनी वेगवान धावा करत संघाला सामन्यात परत आणले.

११६ धावांवर सनरायझर्स हैदराबादची दुसरी विकेट पडली. अभिषेक शर्मा ३४ चेंडूत ५५ धावा करून बाद झाला. यानंतर राहुल त्रिपाठी आणि हेनरिक क्लासेनने वेगवान धावा करत हैदराबादची धावसंख्या दोन विकेट्सवर १५० धावांपर्यंत नेली. चहलने क्लासेनच्या रूपात दुसरा बळी घेतला. क्लासेन १२ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ राहुल त्रिपाठीही २९ चेंडूंत ४७ धावा करून चहलचा तिसरा बळी ठरला. याच षटकात चहलने एडन मार्करामचा चौथा बळी बनवला आणि तो आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला. चहलच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे राजस्थानचा संघ सामन्यात खूप पुढे गेला होता.

हैदराबादला विजयासाठी शेवटच्या दोन षटकांत ४१ धावांची गरज होती. अशा परिस्थितीत ग्लेन फिलिप्सने कुलदीप यादवच्या एका षटकात तीन षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर २२ धावा केल्या आणि हैदराबाद संघ पुन्हा सामन्यात आला. मात्र, त्याच षटकात फिलिप्सही बाद झाला. हैदराबादला शेवटच्या सामन्यात १७ धावांची गरज होती. अब्दुल समद आणि मार्को जॅनसेन यांनी पाच चेंडूत १२ धावा केल्या आणि हैदराबादला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. समद झेलबाद झाला, पण तो नो बॉल ठरला आणि आता हैदराबादला शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. अशा स्थितीत समदने षटकार ठोकत हैदराबादला विजय मिळवून दिला.

ग्लेन फिलिप्सला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा