दोडामार्ग :
दोडामार्ग पोलिसांनी बिगर परवाना वाळू वाहतुक करणाऱ्या चार डंपरवर शनिवारी कारवाई केली. बाजरपेठेपासून काही अंतरावरच कारवाईत डंपर सहित एकूण ३६,६४,००० एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चारही डंपर चालकांवर वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या प्रकरणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सावंतवाडीहून दोडामार्गच्या दिशेने चार डंपर विना परवाना वाळू वाहातुक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहिती नुसार दोडामार्ग पोलिस बाजरपेठेपासून काही अंतरावर बांदा रोडवर गस्त घालून बसले होते. दरम्यान चारही डंपर येताच त्यांच्यावर धाड घातली. यावेळी त्यातील दोन डंपर चालकांनी पलायन केले. एमएच ०७ एक्स ०४९३, एमएच ०७ ईएन ०७०९, एमएच ०७ एजे ६१३१, एमएच ०७ एजे ९९८१ हे चारही डंपर पकडून पोलिस ठाण्याच्या आवारात आणले. प्रत्येकी ९,१६, ००० मिळून चारही डंपर सहित ३६,६४,००० एवढा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच हाती भेटलेल्या दोन डंपर चालकांनाही पोलिस ठाण्यात दाखल केले. पळून गेलेल्या दोन डंपर चालकांचा मालक कोण हे जाणून घेऊन मालकाशी संपर्क साधला व त्या दोन्हीं चालकांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याची सूचना मालकाला दिली. त्यानुसार ते दोघेही चालक पोलिस ठाण्यात दुपारी स्वतःहून हजर झाले. डंपर चालक विजय हनुमान जाधव (वय ३० रा. पिंगुळी ता कुडाळ, मूळ राहणार यादगिरी विजापूर कर्नाटक), रियाज तालीकोठ (वय २४ रा. कुडाळ रेल्वे स्टेशन जवळ, मूळ राहणार कलकेरी विजापूर कर्नाटक), प्रकाश शंकर राठोड (वय ३२ रा. कुडाळ नेरुळपार, मूळ रा मुद्दे बिहाळ विजापूर कर्नाटक), विनोद मोतीराम राठोड (वय २८ रा. कुडाळ गुडीपूर, मूळ राहणार मुद्देबिहाळ विजापूर कर्नाटक) या चारही चालकांवर वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर, हवालदार अनिल पाटील, उमेश देसाई यांनी ही कारवाई केली.