You are currently viewing विराटच्या ‘होम ग्राउंड’वर दिल्लीचा विजय

विराटच्या ‘होम ग्राउंड’वर दिल्लीचा विजय

*विराटच्या ‘होम ग्राउंड’वर दिल्लीचा विजय*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएलच्या ५०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह दिल्लीने आरसीबीकडून मागील पराभवाचा बदला घेतला. १५ एप्रिल रोजी आरसीबीने दिल्लीचा २३ धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयासह दिल्लीने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्यांना अजून चार सामने खेळायचे आहेत. दिल्लीचा संघ गुणतक्त्यात १०व्या स्थानावरून ९व्या स्थानावर पोहोचला आहे. चार विजय आणि सहा पराभवानंतर १० सामन्यांत त्यांचे आठ गुण आहेत. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचे १० सामन्यांत १० गुण झाले असून ते पाचव्या स्थानावर आहेत.

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूने २० षटकांत ४ गडी गमावून १८१ धावा केल्या. दिल्लीने १६.४ षटकांत तीन विकेट गमावत १८७ धावा करून सामना जिंकला. विराट कोहली प्रदीर्घ कालावधीनंतर घरच्या मैदानावर उतरला, पण त्याला विजय मिळवता आला नाही. मूळचा दिल्लीचा असलेला कोहली अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळ खेळत मोठा झाला.

दिल्लीच्या या सामन्यात फिलिप सॉल्टने मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याने ४५ चेंडूत ८७ धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने आठ चौकार आणि सहा षटकार मारले. रिले रुसोने २२ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. मिचेल मार्शने २६ आणि डेव्हिड वॉर्नरने २२ धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने नाबाद आठ धावा केल्या. जोश हेझलवूड, महिपाल लोमरोर, हर्षल पेटल यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

आरसीबीच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीने सर्वाधिक ५५ धावा केल्या. त्याच्याशिवाय महिपाल लोमरोरनेही अर्धशतक झळकावले. महिपालने २९ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. महिपालचा स्ट्राइक रेट १८६.२१ होता. कर्णधार फाफ डुप्लेसिसने ३२ चेंडूत ४५ धावा केल्या. दिनेश कार्तिकने ११ आणि अनुज रावतने नाबाद आठ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल खातेही उघडू शकला नाही. दिल्लीकडून मिचेल मार्शने दोन बळी घेतले. खलील अहमद आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

संघाच्या विजयासाठी न खेळता वैयक्तिक विक्रमाकरता खेळताना विराट कोहलीने आयपीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ५५ धावांची खेळी केली. हे त्याचे आयपीएलमधील ५०वे अर्धशतक होते. विराटच्या या खेळीमुळे आरसीबीने या सामन्यात १८१ धावा केल्या. सामन्यानंतर कोहलीने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक आणि पत्नीला दिले. विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्माही सामना पाहण्यासाठी आले होते. या सामन्यापूर्वी त्याने प्रशिक्षकांची भेट घेतली आणि त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले.

फिलिप सॉल्टला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा