You are currently viewing फडक्यातली भाकरी

फडक्यातली भाकरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजेच सन्माननीय सदस्य लेखक कवी अशोक पवार लिखित अप्रतिम लेख*

🔘 *फडक्यातली भाकरी 🔘*

✍🏽 अशोक पवार, बलवडी भा.
____________________

भूक आणि गरिबी या पाठीशी पाठ लावून आलेल्या सख्ख्या बहिणी… दोघींच सख्य फारचं जमत…यां दोघींची सॊयरीक कुठं जुळवायची म्हंटल तर फार कोण जमवून घेत नाही, आटापिटा करावा लागतो…..

परक्याच्या पोराची कणवं ही स्वतः आई झालेल्या बाईलाचं जास्त येते .. थोडक्यात काय तर परिस्थितीची जाण ही तशी परिस्थिती भोगलेल्याला किंवा तशा परिस्थितीत असणारालाच जास्त असते…
माणूस नावाच्या प्राण्याची भूक आणि त्या भुकेला शमविण्यासाठी चाललेला त्याचा आटापिटा आपण नित्यनेमाने पाहतो. पोटाच्या भूकेबरोबर मानव प्राण्याला ज्ञानाची भूक सुद्धा असते. प्रयत्न करत असतो.तो सतत नवीन काही शिकत असतो. पण ज्ञानाची भूक पूर्ण करण्यासाठी आधी पोटाची भूक म्हणजे क्षुधाशांती ही महत्त्वाची असते.वेळ प्रसंगानुसार , परिस्थितीनुसार माणूस जे मिळेल ते खाऊन क्षुधाशांती करत असतो. सामान्य परिस्थितीमध्ये भूकेची जाणीव होण्याआधी माणसं पोटभर जेवतात.पण परिस्थिती नसताना पोटाची आग विझवून जगण्याची धडपड करणाऱ्यांना भूक चांगलीच माहीत असते.वेळेला मिळालेली भाकरी खूपच चविष्ट असते.तिची चव पंचतारांकित हॉटेलपेक्षा खूपच भारी असते. अशाच एका कठीण काळात वेळेला मला मिळालेल्या फडक्यातील भाकरीची ही खरीखुरी गोष्ट……..

साल होतं 1995. मी टी. वाय. बी.एस्सीला कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक (जुळेवाडी )येथे होतो. तस बघितलं तर कृष्णा महाविद्यालय हे सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर मध्यवर्ती .. त्यामुळं सांगली जिल्ह्याच्या वाळवा, कडेगाव, शिराळा, तर सातारच्या कराड तालुक्याच्या
ग्रामीण भागातील मुलं शिक्षणासाठी इथं प्रवेश घेत.. त्याला कारण म्हणजे तिथं कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची मोफत तर मेसची अगदी अल्पखर्चात सोय होती. जवळच्या गावातील मुलं एस. टीन येऊन जाऊन करायची. तर लांबची वसतिगृहात. माझ्या वर्गात रमेश निवृत्ती जाधव नावाचा, सोनकीरेचा एक वर्गमित्र होता. मी वसतिगृहात राहायचो तर रमेश सोनकीरे वरून एस.टी.ने दररोज कॉलेज मध्ये यायचा. रमेशच्या घरची परिस्थिती अगदीच हलाखीची होती, त्याच परिस्थितीनं त्याला संयमी आणि सोशिक बनवलं होतं .त्याचा संयम आजतागायत टिकून आहे किंबहुना तहयात टिकेल याची खात्री मला आहे. कधी एस. टी. चा पास संपला तर पुढच्या पासासाठी पैश्याची जुळणी होईपर्यंत चार पाच दिवस हा पट्ट्या मधनं मधनं डोंगरातनं दहा बारा किलोमीटर चालत कॉलेजला यायचा. पायात स्लीपर आणि अंगात घालायला कॉलेजच्या तिन्ही वर्षासाठी एकच ड्रेस. तोही त्याच्या थोरल्या भावाला मागं केव्हातरी, कुठल्यातरी पाहुण्यानं आहेर म्हणून दिलेला. निळसर पॅन्ट आणि पट्यापट्याचा शर्ट, तो ड्रेसच त्याचा ब्रँड झालेला. त्यामुळं तो कुठूनही लांबून ओळखून यायचा … रमेशला आपल्या घरच्या परिस्थितीची पुरेपूर जाणीव होती त्यामुळे तो कधीही टारगट आणि वाह्यात मुलांच्यात मिसळला नाही, मात्र त्याची आणि माझी मैत्री घट्ट जमली होती. तो घरच्या अनेक गोष्टींबाबत माझ्याशी हितगुज करायचा, त्याच्या बोलण्यातून जाणवायचं की त्याचं आणि त्याच्या थोरल्या भावाच म्हणजे पांडाबापूचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.अगदी रामा- लक्ष्मणाच प्रेम म्हटलं तर वावगं ठरणार नाही.रमेशच्या शिक्षणासाठी पांडाबापूने खूप खस्ता खाल्ल्या होत्या. रमेशलाही त्याची जाणीव होती..
तशी माझीही परिस्थिती त्याच्यासारखीच म्हणजे आम्ही दोघ समदुःखी होतो. आयुष्याकडं कडं बघताना खूप माफक अपेक्षा होत्या आमच्या…
इतर गर्भश्रीमंत मुलं आपल्या ध्येयाकडं बघताना पार क्षितिजापलीकडं पहात होती. पण आमची फर्लांगभर काय कासराभर सुद्धा पाहण्याची ऐपत नव्हती..
आमच्याच वर्गात दत्ता महाडीक नावाचा एक चिंचणी (अं) चा वर्गमित्र होता तो कॉलेजला रोज हिरो होंडा(ss) गाडी घेऊन यायचा. पायात स्पोर्ट शूज असायचे. त्याचे वडील किर्लोस्कर कंपनीत होते. त्याचा मला खूप हेवा वाटायचा…..वाटायचं भविष्यात जाऊन आपल्याला अशी मोटरसायकल मिळाली तरी आपण सिकंदर होऊ.. कधी गावाकडं घरी गेलो तर गेल्या गेल्या हातपाय धुण्यासाठी रांजनातून डिचकी (तवली )बुडवून अंगणातील ओबडधोबड दगडावर उभा राहून त्या दोन अडीच लिटरच्या डिचकीतील पाणी पुरवून पुरवून हातपाय धुवायचो.. तवा वाटायचं आपल्या अंगणात एका बाजूला कोपऱ्यात कुठंतरी शहरात असतो तसा एक नळ असावा आणि मनसोक्त हातपाय धुता यावेत.. अश्या अनेक कितीतरी अल्पसंतुष्ट अपेक्षा त्यावेळच्या परिस्थितीला अनुरूप होत्या…
पावसाळी आभाळातील ढग भराभर पुढे सरकावेत तसें कॉलेजचे दिवस पुढे सरकत होते बघताबघता वर्ष संपून वार्षिक परीक्षा सुरु होऊन संपत आलेल्या.. हॊस्टेलवरच्या ज्या ज्या मुलांच्या परीक्षा संपतील तशी ती आपापल्या गावी जात होती.. परीक्षा चालू असताना सकाळी आणि दुपारची रमेशची भेट व्हायची पण अगदी जुजबी बोलणं होत होत… आता रमेशची पण परीक्षा संपली आणि होती अन माझेच दोन दिवसाचे दोन पेपर राहिले होते. आता होस्टेलवर अगदी सहा-सात मुलं राहिली होती आणि अचानक हॊस्टेलचे रेक्टर निकम सर यांनी फर्मान काढलं की सहा सात मुलांसाठी हॊस्टेलची मेस सुरु ठेवणं शक्य नाही तरी आता मुलांनी बाहेर खाजगी मेसला आपापली व्यवस्था करावी…
मला आता माझ्या राहिलेल्या दोन दिवसाच्या दोन पेपरच्या अभ्यासापेक्षा दोन दिवसाच्या जेवणाचीच काळजी जास्त वाटू लागली कारण बाहेर खाजगी खानावळीत जाऊन जेवायचं म्हंटल तर ताटाला 20 रु घायचे आणि तेवढी माझी ऐपत नव्हती.. दुपारच्याला रमेश त्याची परीक्षा संपल्यामुळे आणि त्याचदिवशी संध्याकाळी तो काही कामानिमित्त पुण्याला जाणार असलेने माझा निरोप घेण्यासाठी आला, कारण परत आम्ही केंव्हा भेटणार होतो हे आम्हा दोघांनाही माहित नव्हतं. मी त्याला थोडा चिंतातूर दिसलो. त्यांच कारण त्यानं मला विचारलं आणि मी त्याला ते सहजच सांगितलं. तसा तो मला म्हणाला काळजी करू नकोस माझ्याकडे आहे एक पर्याय आहे. मला म्हणाला आमच्या गावावरून विटा-रेठरे कारखाना ही एस. टी सकाळी साडेनऊला येते. दोनदिवस त्या एस. टीत माझ्या थोरल्या भावाला म्हणजे पांडाबापूला जेवण ठेवायला लावतो तू इथं काढून घे म्हणजे झाल. मी त्याला म्हंटल अरे तुझ्या घरातून तीनकप्पी डबा येणार तो मी परत कसा देणार?तर म्हणाला खुळा आहेस तू!तुला तीनकप्पी डबा द्यायला आमच्या घरी तीनकप्पी डबा आहेच कुठं! .. तुला फडक्यातनं बांधून जेवण येईल….एखाद्या माणसाला खूप तहान लागावी आणि त्याच्या हाती अख्खा रांजनच लागावा तस मला झालं..
मला भेडसावणारा यक्षप्रश्न रमेशनं चुटकीसरसी सोडवला होता त्यामुळं मी निर्धास्त झालो आणि म्हंटल चला फडक्यातनं तर फडक्यातनं..वेळेशी मतलब …रंगीबेरंगी आणि आकर्षक दोन कप्पे किंवा तीन कप्पे सो कॉल्ड टिफिन बॉक्स नावाची एक गोष्ट आता चिमुरड्या पोरांपासून शाळा कॉलेज आणि ऑफिसला जाणाऱ्या सगळ्यांकडे दिसतो.खरं तर त्या टिफिन बॉक्स मध्ये चमचमीत पदार्थ असतात पण फडक्यातल्या भाकरीची चव काही त्याला येणार नाही. फडक्यातल्या भाकरीला आई, भावजय, बहीण नावाच्या बाईचा स्पर्श असतो. परातीत थापताना तिला आकार देता देता पोराबाळांच्या भविष्याला आकार दिलेला असतो. भाकरी चुलीच्या जाळा पेक्षा पोराबाळांच्या पोटाच्या आगीवरच जास्त भाजलेली असते. मुलाबाळांच्या उज्वल भविष्यासाठी चटके सोसणाऱ्या आईच्या डोळ्यातील अश्रूच्या पाण्यानं ती पचलेली असते. बापाच्या किंवा त्या घरातील कर्त्या पुरुषाच्या कळकट दंडक्याच्या धडप्यात बांधल्यावर ती आणखीनच चविष्ट बनते. त्या फडक्यातल्या भाकरीबरोबर किती भावना गुंतलेल्या असतात हे शब्दात सांगणं कठीण आहे.पण त्या काळात होस्टेलवर राहत असल्यामुळे मला ही भाकरी खायला मिळाली नव्हती. मेसचं जेवण तसं बरं होतं पण आईच्या हातचं किंवा एखाद्या मित्राच्या घरी गेलो तर घरचं जेवण म्हणून आम्हाला त्या जेवणाचं कमालीचं अप्रूप होतं.आता शेवटच्या दोन दिवसांसाठी माझी अडचण निर्माण झाली होती.रमेशने त्याच्या भावाकरवी माझा तात्पुरता प्रश्न सोडवला होता.पण त्याने सांगितल्याप्रमाणे त्या फडक्यातल्या भाकरीची मी आतुरतेने वाट पाहत होतो हे मात्र नक्की. बघितलं तर दोन दिवसाचा प्रश्न होता..
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून, होस्टेलवरून कॉलजेच्या पश्चिमेला खालच्या बाजूस जूळेवाडी च्या स्टॉपवर गेलो, जिथं रस्त्याच्या पूर्व बाजूला डॉ. पवारांचा दवाखाना तर पश्चिम बाजूला एक टपरीवजा हॉटेल होत. तिथंच एस. टी थांबायची. मी बरोबर पावणेदहा वाजता जाऊन हॉटेलच्या बाजूला उभं राहून शेणोली स्टेशनकडे तोंड करून आशाळभूत नजरेनं एस. टी. ची वाट बघू लागलो. रमेशन घरी सांगितलं असेल का?, सांगितलं असेल तर त्याच्या भावाच्या लक्षात असेल का? एस. टी. वेळेत येईल का? अशा अनेक शंकेच्या मालिकेन माझी धाकधूक वाढली होती अन एवढयात गाडी आली आणि मी ड्रायव्हर जवळ गेलो ड्रायव्हरन मला त्याच्या सीट खालून फडक्यात बांधलेलं जेवण दिल. पांढऱ्या शुभ्र धोतराच्या फडक्यात बांधलेलं.. वरती वाकळच्या दोऱ्यान ओवून एक चिठ्ठी बांधली होती आणि तिच्यावर माझं नाव लिहलं होत “अशोक पवार.”.
ते जेवण घेऊन मी झपाझप पावलानी होस्टेलची रूम गाठली. जेवण सोडून बघितलं तर तीन भाकरी, त्याच्यावर चार चपात्या, चपात्यावर पिवळ्या मुगाची उसळ, एका भाकरीच्या पापुड्यात आतल्या बाजूला मिरचीचा खर्डा(ठेचा ), एका काचेच्या बाटलीत थोडं ताक . असं दोन वेळच जेवण होत.. मी भाकरीआणि ताक कुस्करून हाणलं , आणि चपाती, उसळ रात्रीच्या जेवणासाठी ठेवली आणि 11 वाजता पेपरला गेलो. झालं आता एका दिवसाचा प्रश्न राहिला होता. दुसरा दिवस उजाडला मी आदल्या दिवशी सारखंच आवरून जुळेवाडीच्या बसस्टॉप वर गेलो आणि एस टी ची वाट पहात उभा राहिलो पण आज कालच्या सारखी धाकधूक नव्हती. आज जरा कालच्यापेक्षा पाच मिनिट गाडी लवकरच आली मी पळतच ड्रायव्हर जवळ गेलो..बघितलं तर गाडीत जेवणच नव्हतं..ड्राइव्हरला विचारलं तर त्यानं नुसती नकारार्थी मान हलवली. माझा चेहरा एकदम काळवंडला पण आता विचारायचं तरी कुणाला? त्यावेळी आतासारखी संपर्क माध्यमपण नव्हती. मी हताश झालो.
भूक लागलेलीच होती पण आता हॉटेलमध्ये जाऊन काय खावं म्हंटल तर माझ्याकडं वेळ आणि ऐपत दोन्हीही नव्हतं…. मी माझीच समजूत घालू लागलो की आपली आई नवरात्रीच किंवा रथसप्तमीला सूर्यनारायणाचं व्रत निरंकार करते मग एक दिवस आपण उपाशी राहिलो तर काय बिघडणार आहे!? असा विचार करतच मी रूमवर पोहचलो आणि परीक्षेसाठी लागणार तगड(पॅड ) घेऊन मी उपाशीपोटीच पेपरला गेलो. दोन वाजता पेपर सुटला आणि मी होस्टेलच्या रूम वर आलो एवढ्यात मला होस्टेलचा शिपाई अंकुश वाघमारेन हाक मारली म्हणून मी त्याच्यांकडे गेलो तर त्यान मला फडक्यात बांधलेलं जेवण माझ्या हातात दिल. मी संभ्रमात पडलो की आता हे जेवण कस आणि कुठून आलं?, माझा प्रश्नार्थक चेहरा बघून शिपाई खुलासा करत मला म्हणाला की काल तुला ज्या तुझ्या मित्राच्या भावानं एस.टीत जेवण ठेवलं होत त्यांना आज सकाळी रानातून जनावराचं शेणघाणं, वैरणकाडी करून घरी येईपर्यंत थोडा उशीर झाला आणि एस. टी चुकली म्हणून मग ते मघाशी एक वाजता सायकलवरून जेवण घेऊन इथं होस्टेलवर आले होते , गळ्यात टॉवेल, घामान पूर्ण डबडबलेले , सायकलला पायन्डेल पण नव्हते त्यांच्या नुसत्या कण्यावर होती… हे सगळं वर्णन ऐकून मी थरथरत्या हातानं जेवण घेऊन रूममध्ये आलो आणि जेवण सोडलं आणि मला एकदम रडूच आलं. मनात विचारांच काहूर माजल… काय नातं होत माझ्यात आणि त्यांच्यात!? बघितलं तर त्यांच्या भावाचा मित्र मी,..
रक्ताच्या नात्यासाठी कुणीही काहीही करेल पण इथं आम्ही दोघांनी एकमेकांना साधं बघितलेलं पण नव्हत. बरं सर्वासमोर मला जेवण देऊन माझ्यावर उपकाराच ओझं लादून त्याची ऐट मिरवायला तो माणूस माझी साधी भेट घेण्यासाठी थांबला पण नव्हता..
सोनकीरे ते कॉलेज अरतपरत 14 दुणे 28 किलोमीटर अंतर आणि परत जाताना घाटाचा रस्ता चढणं …त्यात एप्रिल महिन्याचं ऊन….
काय एकेक दिवसाची देणगी असते!… पंढरीच्या पांडुरंगान जनाईसाठी जातं ओढल होतं, गोऱ्या कुंभारासाठी चिखल तुडवला होता, आणि इथं यां सोनकीरच्या पांडुरंगान मी उपाशी राहू नये म्हणून उन्हातानाची सायकल रेटली होती. मुळात एका पोरग उपाशी राहता कामा नये ही तळमळ पांडाबापूच्या हृदयाच्या गाभाऱ्यात उमतटली होती आणि ती पराकोटीची होऊन पूर्णतःवाला किंबहुना ब्रम्हत:वाला पोहचली होती आणि त्या ब्रम्हत:वात मी मात्र चिंब भिजून गेलो होतो.
मी घास न मोडता तसाच रूममधून बाहेर पडलो आणि पळतपळत छत्रपती संभाजी विद्यालयाच्या बाजूला गेलो तिथून उत्तर बाजुला बघितलं की शेणोली स्टेशनच्या पलीकडे सोनकीरेला गेलेला शेणोलीचा घाट दिसायचा. त्या घाटरस्त्याकडं मी डबडबलेल्या डोळयांनी पाहू लागलो… तर एक निष्काम, निरपेक्ष भावनेचा पांढरट ठिपका घाटातून सोनकीरच्या बाजूला सायकलच्या वेगान हळूहळू सरकल्याचा मला भास झाला, त्या आभासी ठिपक्याला हात जोडून मी दंडवत घातला आणि परत येऊन जेवणावरती बसलो पण तरीसुद्धा मला जेवूच वाटेना… आता त्या फडक्यातल्या भाकरीवर माझा विलक्षण जीव जडला होता, भाकरी काल ही आली होती अन आजही, पण आजची भाकरी पांडाबापूला सायकल रेटताना आलेल्या घामाचं लेणं लेवून ती आली होती, त्यामुळं एखाद्या प्रेयसीन दिलेला रुमाल आठवण म्हणून जपून ठेवावा तशी ती जपून ठेवण्याचा मोह मला होऊ लागला. पण ती ताजीतवानी राहणार का? अशी शंका आली मग इजीप्त देशामध्ये राजाचा मृत्यू झाल्यावर त्याच कलेवर पिरॅमीडमध्ये वर्ष्यानुवर्षे साजिवंत ठेवतात तस यां भाकरीचं मला काही करता येईल का? असा कायबाय आगळीक विचार मी करू लागलो पण ते शक्य नव्हतं, शेवटी ज्या फडक्यातून ती भाकरी आली होती ते फडकचं जपून ठेवायचा निर्णय घेतला आणि जेवायला सुरवात केली..
कालच्यासारखीच भाकरी आणि मुगाची उसळ होती..
डोळ्यातील अश्रूचं टपटपनं अजून चालूच होत आणि ते खालच्या मुगाच्या उसळीत मिसळत होते अन ती अधिकच चवदार होत होती….

परीक्षा संपली होती आणि मी गावी आलो. पुढ आठवड्याभरान मी आणि माझा एक गावातला मित्र श्रीकांत जाधव असे दोघेजन जाऊन सोनकीरच्या त्या पांडुरंगाला भेटून आलो…

शिक्षण पूर्ण झाल्यावर रमेश महाडला एका केमिकल कंपनीत रुजू झाला. आज तो चांगल्या पोस्टवरती काम करतो.त्या दोघा भावातील सख्य आज ही तसंच आहे आणि तहयात राहील यात शंका नाही. कदाचित माझ पूर्वसंचित दमदार असेल म्हणूनच
रमेशसारख्या मित्राचा आणि त्याच्या भावाचा सहवास मला लाभला जो आजन्म, अभंग राहील……

पांडाबापून ज्या फडक्यातून भाकरी आणून दिली ते फडक मी आजही माझ्या संग्रही जपून ठेवलंय..
मी ज्या ज्या वेळी नीरभ्र आकाशात पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे पाहतो तेव्हा चंद्राऐवजी मला पांडाबापूची भाकरी दिसते, अगदी ताजी ताजी मघाशीच आणून दिल्यासारखी..

पांडाबापूच माझ्यावरती फडक्यातल्या भाकरीच कर्ज आहे ज्यातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही..
आज पांडबापूला मी ए. सी. कार मधून नेऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेऊ घातलं तरी त्याला फडक्यातल्या भाकरीची सर येणार नाही..मग मी काय करू शकतो!? तर आज इतक्या वर्षांनी सुद्धा मला त्याची जाणीव आहे आणि म्हणूनच हा लेख लिहण्याचा सारा खटाटोप कृतज्ञतेच्या आणि जाणीवेच्या भावनेतून त्या सोनकीरेच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो ….

धन्यवाद🙏🏻
श्री अशोक पवार बलवडी भा. 8669004432…

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा