You are currently viewing गाव माझे सुंदर (कापडणे)

गाव माझे सुंदर (कापडणे)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*2) गाव माझे सुंदर (कापडणे)*

 

मंडळी, तर आपण त्या ६०/७० वर्षांपूर्वीच्या शिक्षणा विषयी

बोलत होतो.नुकतीच कुठे शिक्षणाविषयी जागृती निर्माण होत

होती.पण शिक्षणाने काही साध्य होते यावर जनतेचा विश्वासच नव्हता.अर्थात लोकांचाही यात काही दोष होता असे ही म्हणता येणार नाही.कारण शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा

डोळा आहे, जग दाखवणारी खिडकी आहे,याची जाणिव वा त्याचे फलितच त्यांना ज्ञात नव्हते.शेतात जावे, राबावे, त्यातून

मिळेल ते खावे, हवे कशाला शिक्षण? हा त्यांचा साधा सरळ

हिशोब होता त्यात त्यांची काय चूक होती?

 

शिक्षणाचे हजार फायदे (आज जे दृष्टी पथात आले आहेत)

तेव्हा दृष्टीपथात आले नव्हते.त्यामुळे मुलींनी शाळेत जाण्यास

आयांचाच प्रचंड विरोध होता. घरी मदत कोण करेल? लेकरं

कोण सांभाळेल?झोळी कोण हलवेल? प्रसंगी भाकऱ्या कोण

थापेल? या प्रश्नांचा डोंगर समोर असतांना त्या मुलींना शाळेत

का पाठवतील? मुलांनाही गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांच्या

मागे रानात जावे लागे.दहा साडेदहा झाले की सकाळचा प्रचंड

गलका संपून गावात शुकशुकाट होत असे. म्हातारी माणसे व अशी

लेकरं सोडून आयाबाया पुरूष सारे शेतात असत ते संध्याकाळ

झाल्यावरच घरी येत असत.मुलींचीच काय मुलांच्या शिक्षणा

विषयी ही आस्था नव्हतीच! त्यामुळेच वडिलांना शिपाई हाताशी घेऊन मोहिम उघडावी लागत असे.मला आठवते,आमच्या घरासमोर हिमा(हिंमत गुलाबराव पाटील, माझा चुलतभाऊच लागतो)बापू राहतो. माझ्याच वयाचा असेल बापूही आता.ह्या शाळेसाठी पकड मोहिमेत हिमा बापूने बराच मार खाल्ला, पण बापू काही जास्त शिकला नाही. आता आठवण काढली की म्हणतो “जाऊ दे व बैन, जे व्हयनं ते व्हयनं”! बापूने मात्र वडिलांची खूप सेवा केली अगदी पोटच्या मुला सारखी!त्या काळातील

शिक्षक मात्र विद्यार्थी संख्या वाढवणे , प्रवेश घ्यायला लावणे

ह्या बाबतीत सजग होते, प्रयत्नशील व ध्येयवादी ही होते.

आणि कामचुकार अजिबात नव्हते.खुद्द आमचा सातवीचा

वर्ग सकाळी सात ते रात्री १२ पर्यंत असे. पैसे देऊनही आज

काल कोणी एवढे राबतील का? अहो, हल्ली भरमसाठ पगार

घेऊनही आम्ही आठ तास धडपणे काम करत नाही तेव्हा एवढा

ओव्हरटाईम? छे! छे! आजकाल आम्हाला सारे विनासायास

वा फुकटात हवे असते. आमच्या निष्ठा आम्ही कुठे गहाण

ठेवल्या आहेत हेच मला तर कळत नाही?

 

मला आठवते, सातवीच्या आमच्या वर्गाला आमच्या एकनाथ

गुरूजींना लोकसभा व विधान सभेचे कामकाज कसे चालते

ते शिकवायचे होते. दुपारी दोनच्या सुमारास वर्गातच गुरूजींनी

मुलांचे दोन गट केले.(मी आता ही डोळ्यांनी बघते आहे)

व वर्गातच लोकसभा विधानसभा तयार झाली.अगदी प्रात्यक्षिकासह, गुरूजींनी प्रश्नोत्तरासह असे काही समजावले की ते कायमचे डोक्यात फिट्ट बसले, कधीच विसरलो नाही.

एकदा भुगोल शिकवायला त्यांनी त्यांचा सहकारी व मित्र

दंगल गुरूजींना( जे नुकतेच निवर्तल्याचे ऐकले) बोलावले.

दंगल गुरूजी आम्हाला गढीवरच्या शाळेतल्या त्या मैदानात

बाहेर घेऊन गेले. बाजुला भात नदी वहात असे.(आता हरवली

आहे) ती नदी म्हणजे समुद्र. मग समुद्राकडून जमिनीकडे येणारे व जमिनीकडून समुद्राकडे जाणारे असे खारे, मतलई

वारे त्यांनी प्रात्यक्षिकासह समजावले जे मी कॅालेज लाईफ

मध्ये ही विसरले नाही.आहे की नाही शांतीनिकेतन?अशी ती त्या काळची झपाटलेली

शिक्षकांची ही पिढी होती, ध्येय होते, निष्ठा होती, काही

करण्याची जिद्द मनात होती.हे त्या शिक्षकांचेच उपकार आहेत की आमच्या सारख्या ध्येयवादी, निष्ठावान व देशप्रेमी पिढ्या निपजल्या.आमच्यावरही निष्ठेने काम करण्याचे संस्कार झाले

कारण संस्कार हे मागच्या पिढ्यांकडून पुढच्या पिढ्यांकडे

झिरपतात.मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करतात.जे आम्ही

केले.

 

माझे वडिल तर ग्रामसेवा व देशसेवेने झपाटलेले होते. गावा

साठी किती आणि काय करू असे त्यांना होत असे.स्वातंत्र्य

लढा संपल्यावर सुद्धा त्यांचा ग्रामसुधार लढा मात्र चालूच

होता.रोज सकाळी धुळ्यात जाऊन लोकांची कामे करणे,

नोकरीला लावून देणे,खादी भंडाराचे काम सांभाळणे अशी

अनेक आघाड्यांवर कामे करतांना गावात न्याय निवाडा भांडण

तंटे सोडवणे, चोराला शिक्षा करणे ही कामे चालतच असत.

रोज सकाळी तयार होऊन देवडीत ते येण्यापूर्वीच ५/५० लोक

आपले प्रश्न घेऊन हजर असत. तिथल्या तिथे न्याय निवाडा

होत असे. वडिल असे पर्यंत लोकांना कोर्टात जायची गरजच

पडली नाही. शिक्षा सुद्धा आमच्या अंगणात होत असे. एकदा

एका न्हाव्याच्या पोराने चोरी केली असता आमच्याच ओट्यावर त्याला दोरखंडाने बांधलेले मी पाहिले आहे.मी लहान होते. घाबरून चोरून दाराआडून पहात होते व रडत ही

होते, त्याला बांधले म्हणून! माझी आई मात्र चहा करून करून

दमत असे. माझे वडिल मात्र कधीही चहा प्यायले नाहीत .

कट्टर गांधीवादी होते ते. स्वच्छ व साधी रहाणी व उच्च विचार

सरणी हेच त्यांचे ब्रीद होते.

 

एखादा माणूस देशसेवा व ग्रामसेवा या साठी किती झपाटलेला असावा, हे आठवून जेव्हा मी माझ्या वडिलांकडे पाहते तेव्हा तेव्हा मला मोठे आश्चर्य वाटते.त्यांच्या नसानसात

फक्त नि फक्त कापडणे गांव होता.नुकतेच स्वातंत्र्य मिळाले

तेव्हा लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे होते. अंधश्रद्धांचा पगडा

फार होता. कीर्तन भजना शिवाय मनोरंजनाची साधने उपलब्ध

नव्हती.तेव्हा मग निळू फुले कमल पाध्ये प्रभाकर पाध्ये वसंत बापट या लोकांची कलापथके होती. ते गावोगावी त्याचे प्रयोग करून

समाजोपयोगी अशा वग नाट्या सारख्या नाटिका सादर करत

असत.”बिन बियाचे झाड”, गाढवाचे कान”अशी एकदोन नावे मला आठवतात.अर्थात इतक्या जुन्या काळी लॅाजिंग बोर्डिंग

थोडेच होते? मग २/३ दिवस ह्या मंडळींचा मुक्काम आमच्याच

घरी असे. मी ते रिहर्सल करतांना कपडे बदलतांना लहान असल्यामुळे त्यांच्या जवळच लुडबुड करत असे व त्यांना ही

त्याचे काही वाटत नसे.(बरे झाले, लुडबुड केली, नाहीतर आज

हे कसे लिहीले असते?)

 

आणि मग प्रयोगा दरम्यान मी स्टेजवरच झोपी जात असे.मग

कोणी तरी आमचे गाठोडे घरी आणून टाकत असे.लहान पणापासूनच मुलांना शाळेची गोडी व आकर्षण वाटावे म्हणून

सरकार वेगवेगळ्या योजना त्या वेळी आखत असे.शिवाय

कुपोषणही होतेच. मग आमच्या घराशेजारीच वाड्यात

मोराण्याच्या कमल ताई एक लहान मुलांची शाळा चालवत

असत. मुलांनी यावे म्हणून सरकार दूध पुरवित असे.कॅन भरून

दूध तिथल्या तिथे मुलांना प्यायला दिले जाई.कमल ताई प्रत्येकाला ग्लास भरून देत असत. बघा, मुले शिकावीत

म्हणून सरकारची किती धडपड असे. काही मुलांना दूध आवडायचे काहींना नाही. मला ही कमल ताई देत असत

पण मला ते मुळीच आवडत नसे. त्या काळी स्त्रिया शिकत

नसत मग दुपारी कमल ताई त्यांना गाणी गोष्टी शिकवतांना हातात

पाटी पेन्सिलही देत तेव्हा बायकांना प्रचंड लाज वाटून त्या

पदराआड तोंड लपवून खुदू खुदू हसत ते मला आताही डोळ्यां

समोर दिसते आहे.

“ गुडघा गुडघा चिखलात पाय रोविले हो

एका एका भाताचे रोप लाविले हो”

 

“ आम्ही शेतकरी शेतकरी बायका”

अशा स्वरूपाची ती गाणी म्हणत लोकरंजन व शिक्षणही

होत असे.सारेच झपाटलेले होते तेव्हा! हे झपाटलेपण कुठे

गेले हो?आज आम्ही देशाला काही न देता देशाकडून फक्त

मागण्या करतो. आपण काय करतो हो देशासाठी? जरा

स्वत:ला विचारून पाहू या ना? काय हरकत आहे?

 

धन्यवाद मंडळी…जयहिंद.. जय महाराष्ट्र..

 

आपलीच..

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

 

प्रतिक्रिया व्यक्त करा