जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या शिक्षकांना कुडाळ पं.स. तर्फे निरोप
कुडाळ
शिक्षकी पेशा सांभाळताना तुम्ही विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार जिल्हा विसरणार नाही. तुम्ही आपल्या गावी जात आहात तेव्हा आपल्या जिल्ह्याचे पर्यटन येथील संस्कार दूरवर पोचवा असे प्रतिपादन कुडाळ पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज केले
कुडाळ तालुक्यात गेले कित्येक वर्षे शिक्षक सेवा बजावलेल्या चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा बीड सांगली ठाणे या जिल्ह्यातील 63 शिक्षकांना आज येथील पंचायत समितीच्या सभागृहात निरोप देण्याचा कार्यक्रम गटविकास अधिकारी श्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, गटशिक्षणाधिकारी संदेश कींजवडेकर, मुकेश सजगाने, शिक्षक नेते केटी चव्हाण, धोंडी रेडकर, उदय शिरोडकर, स्वामी सावंत, नंदकुमार राणे, प्रसाद वारंग, राजा कविटकर आदी उपस्थित होते.
श्री चव्हाण म्हणाले अन्य जिल्ह्यातील शिक्षक यांनी गेली बरीच वर्षे जिल्ह्यात काम केले ते आपल्या या ठिकाणी केलेल्या सेवेतून आपल्या गावी जात आहेत. बाहेर बरीच वर्षे काम केल्यानंतर आपल्या घरी जाण्याची प्रत्येकाला ओढ असते. ती ओढ तुमची या निमित्ताने दिसून येते. शिक्षकी पेशा करताना तुमचे योगदान फार आहे. तुम्ही विद्यार्थी घडविले. तुम्ही तुमच्या जिल्ह्यात गेलात तर वर्षातून किमान एकदा तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी यावे. या जिल्ह्याशी तुमचे ऋणानुबंध कायम राहूदे असे सांगितले.