You are currently viewing आज सिंधुदुर्ग ढासळतोय..??

आज सिंधुदुर्ग ढासळतोय..??

विशेष संपादकीय…..

सिंधुदुर्ग…. महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाकडील सर्वात कमी लोकसंख्या असलेला छोटासा जिल्हा… एका बाजूला खंबीर उभा असलेला सह्याद्री आणि पश्चिमेला आपल्या गर्भात सर्वकाही सामावून घेणारा निळाशार सुंदर समुद्र… सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला, दशावतार, जत्रोत्सव, रूढी, परंपरा, सण, गावागावात, घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव, होळी, शिमगा असे नानाविविध सण म्हणजे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती. परशुरामाच्या या भूमीवर परमेश्वराने सढळ हस्ते निसर्गाची उधळण केलेली आहे. इथे असलेली जैवविविधता, नारळ फोफळीच्या बागा, आंबा, काजू, फणसाची गोडी तर अवीटच… सिंधुदुर्गातील जेवणाची मेजवानी तर अप्रतिम, माशांची चव तर जगात भारी. इथला नाश्ता घावणे, आंबोली उसळ, कांद्याची खुसखुशीत भजी तर जिभेवर रेंगाळत राहतात. खरंच….. कोंकण ही परशुरामाची भूमी म्हणजे परमेश्वराला पडलेलं एक सुंदर स्वप्न….!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य, नद्या, समुद्र, डोंगर रांगा आणि इथली संस्कृती पाहूनच महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ मध्ये महाराष्ट्रातील युती सरकारने जाहीर केलं. जिल्हावासीयांचं दुर्दैव म्हणजे सरकारने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून फक्त कागदावर घोषित केला, परंतु त्यासाठी पोषक असणाऱ्या कुठल्याच गोष्टी, सोयीसुविधा, या जिल्ह्याला कुठल्याही सरकार कडून आजतागायत मिळाल्या नाहीत. १००% सुशिक्षित असलेल्या सिंधुदुर्गातील शेतकरी देखील कष्टाळू, शासनाच्या कोणत्याही योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत, ७/१२ उताऱ्यांवर नावे देखील कमी. मानी समजला जाणारा इथला शेतकरी शासनाकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करत नाही, किंवा कर्ज काढून शेतीही करत नाही आणि कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या तर मुळीच नाहीत. परंतु आज वेळ आली आहे ती शासनाकडून आपल्या हक्काचे जे आहे ते मागून नाहीतर भांडून घ्यायची.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झाला परंतु कोणत्याही सुविधा जिल्ह्यात उभ्या राहिल्या नाहीत. रस्त्यांची अवस्था तर दयनीय आहे. विमानतळ कित्येकवर्षे होतोच आहे. समुद्र किनारे, नद्या आहेत पण पर्यटन पूरक व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळत नाही. जे गोव्यात पर्यटन बहरते ते सिंधुदुर्गात बहरत नाही. गोव्यापेक्षाही सुंदर समुद्र किनारे असूनही पर्यटक जिल्ह्यात भौतिक सुविधा नसल्याने पाठ फिरवतात. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगपती देखील जिल्ह्यात गुंतवणूक करण्यास पुढे येत नाहीत. कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय बंद पडलेत. हॉटेल व्यावसायिक जे अपुऱ्या सुविधा असलेल्या पर्यटनावर कसेबसे तग धरून होते ते तर कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेमाखातर सिंधुदुर्ग जिल्ह्याला युती शासनाच्या काळात पर्यटन जिल्ह्याचा दर्जा मिळाला त्याचाच एक घटक म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आज सत्तेत आहे. सत्तेतील दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी १००% फलोत्पादनची योजना आणून इथल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलेला. परंतु कोकणातील जनता नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे सह्याद्रीसारखी उभी राहिली आहे. कोकणात शिवसेना रुजवणारे नारायण राणे यांनी मध्यंतरी शिवसेना सोडली. नेते त्यांच्यासोबत गेले देखील परंतु मनापासून शिवसेनेशी एकरूप झालेल्या कोंकणी माणसाने मात्र शिवसेना कधीही सोडली नाही.
महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आले असून या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून सारथ्य करताहेत शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि निसर्गाची, पर्यावरणाची जाण, आवड असलेले आदित्य ठाकरे हे धडाडीचे नेतृत्व देखील सरकारमध्ये मंत्रीपदावर आहेत. शरद पवारांसारख्या मुत्सद्दी, जाणता राजाच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या सरकारकडे सिंधुदुर्गची जनता आशेने पाहत आहे. आज सिंधुदुर्गच्या जनतेचा भ्रमनिरास झाल्यास, विकास न झाल्यास ही जनता आपल्याला कधीही माफ करणार नाही. त्यामुळे जनतेचा अंत पाहू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्याने अनेक मोठमोठी रत्ने दिली आहेत, परंतु भक्कमपणे पाठीशी राहणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकही मंत्रिपद न दिल्याने लोकांच्या मनात पुन्हा एकदा प्रश्न उभा राहू लागलाय की, खरंच आज सिंधुदुर्ग ढासळतोय का?

प्रतिक्रिया व्यक्त करा