बारसू सोलगाव येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाविरोधातील प्रखर आंदोलनामुळे कोकणच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील वातावरण सध्या चांगलेच तापलेलं आहे.
“येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला कोकणात विरोधच होतो, कोकणी माणसं ही विकास विरोधी आहेत” वगैरे चुकीच्या चर्चा काही प्रसार माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये सध्या सुरू आहेत.
कोकणातील जनतेला विकास प्रकल्पं हवे आहेत पण विनाशकारी प्रदुषणकारी प्रकल्पं नकोत हे वारंवार सांगून सुद्धा ही दुषणे लावली जात आहेत.
सध्या महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे.अशावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार यांनी कोकणी जनतेला काय हवं हे ऐकणं आणि ऐकून घेणं गरजेचे आहे.
सौदी अरेबिया सारख्या इस्लामी देशातील अरामको कंपनीचे सगळं ऐकण्यापेक्षा कोकणातील बहुसंख्य हिंदू जनतेची विनंतीवजा मागणी केंद्र आणि राज्यातील “हिंदू राष्ट्र” निर्मितीसाठी कटीबद्ध सरकारांनी ऐकावी अशी येथील जनतेची इच्छा आहे.
आता मुंबई गोवा हायवे चौपदरीकरणाचे काम विलंबाने का असेना पुर्ण होत आहे, चिपी आणि मोपा येथे विमानतळं तयार झालेली आहेत, मुंबई सिंधुदुर्गच्या जवळ येत आहे अशावेळी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी एखादा मोठा आयटी पार्क प्रकल्प (हिंजवडी,पुणे सारखा) आणावा ज्यामुळे या जिल्ह्यातील हजारो युवक/युवतींना रोजगार मिळतील अशी जनतेची मागणी आहे.
चाकण परिसरातील ऑटोमोबाईल उद्योगासारखा एखादा ऑटोमोबाईल असेम्ब्लींगचा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात आणावा.
तसेच या दोन्ही जिल्ह्यांत वर्षाकाठी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सध्या होताना दिसत आहे.(प्राधान्याने मराठी चित्रपट)
आता चित्रपटांबरोबर ओटीटी वरील वेबसिरीजचे पेव फुटलेले आहे अशावेळी मुंबईसारखी एखादी फिल्म सिटी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात यावी अशी इच्छा येथील तरूण वर्गाची आहे.
अशा प्रकल्पांमुळे या दोन्ही जिल्ह्यांतील पर्यावरण तर अबाधित राहील, विनाशकारी प्रदुषण होणार नाही आणि हजारो युवकांना सन्मानजनक नोकऱ्या मिळतील.
हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्नशील राज्यकर्त्यांनी कोकणातील हिंदू महिलांवर लाठ्या चालवण्याऐवजी इस्लामी देशातील गुंतवणूकीकडे लक्ष न देता कोकणातील देवभोळ्या जनतेचा सन्मान करावा, असे मत डॉ.जयेंद्र परूळेकर यांनी व्यक्त केले.