*हैदराबादने दिल्लीविरुद्धची पराभवाची खंडित केली; सहाव्या पराभवानंतर डेव्हिड वॉर्नरचा संघ अडचणीत*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३ च्या ४० व्या सामन्यात ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला आयपीएलच्या १६व्या हंगामात सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शनिवारी (२९ एप्रिल) घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादने त्यांना नऊ धावांनी पराभूत केले. या विजयासह हैदराबाद संघाने दिल्लीविरुद्ध सलग पाच पराभवांचा क्रम खंडित केला आहे. सनरायझर्सने २०२० मध्ये दिल्लीवर शेवटचा विजय मिळवला होता.
सनरायझर्सने मोसमातील तिसऱ्या विजयासाठी हा सामना जिंकला. त्याचे आठ सामन्यांत सहा गुण झाले असून तो नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा हंगामातील हा सहावा पराभव आहे. त्याचे आठ सामन्यांत केवळ दोन गुण झाले असून तो तळाच्या दहाव्या स्थानावर आहे. आता दिल्लीचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग अवघड झाला आहे. त्याला उर्वरित सहा सामने जिंकायचे आहेत. तरच त्याच्या आशा जिवंत राहतील.
सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने २० षटकांत ६ बाद १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ २० षटकांत ६ गडी गमावून १८८ धावाच करू शकला.
दिल्लीकडून या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर खातेही उघडू शकला नाही. तो पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला. सॉल्ट आणि मार्शने संघाला पुन्हा रुळावर आणले, पण मधल्या फळीने पुन्हा एकदा निराशा केली. फिलीप सॉल्ट आणि मिचेल मार्शने सामन्यात अर्धशतक झळकावले. मार्शने ६३ आणि सॉल्टने ५९ धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने १४ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दिल्लीच्या मधल्या फळीबद्दल बोलायचे झाले तर मनीष पांडे एक, प्रियम गर्ग १२ आणि सर्फराज खान नऊ धावांवर बाद झाला. रिपल पटेलने आठ चेंडूत नाबाद ११ धावा केल्या. हैदराबादकडून मयंक मार्कंडेने दोन गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, अकिल हुसेन, टी नटराजन आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हैदराबादसाठी अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी अर्धशतकी खेळी खेळली. अभिषेकने ३६ चेंडूत ६७ आणि क्लासेनने २७ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. अब्दुल समदने २१ चेंडूत २८ आणि अकील हुसेनने १० चेंडूत नाबाद १६ धावांचे योगदान दिले.
मिचेल मार्शला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने गोलंदाजी करताना राहुल त्रिपाठी (१०) कर्णधार एडन मार्कराम (८) हॅरी ब्रुक (०) आणि अब्दुल समद (२८) या चौघांना चार षटकांत एक षटक निर्धाव टाकत केवळ २७ धावांमध्ये तंबूमध्ये परत पाठवले. तर फलंदाजी करताना ३९ चेंडूंत सहा षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्याने ६३ धावांचे योगदान दिले.