सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे युवा कलाकार श्रीराम साईल यांना राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीराम साईल हे गेली दहा वर्षापासून दशावतार कला क्षेत्रामध्ये आपली कला सादर करत आहेत. विविध प्रकारच्या भूमिका साकारत गेली दहा वर्षे अखंडितपणे कलासंच चालवत असून त्यांची कलेतील विविध पात्रे सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.
सध्या साईल हे श्री हेळेकर दशावतार नाट्य मंडळ, कारिवडे यांच्या नाट्य मंडळात कार्यरत असून, या कला क्षेत्रामध्ये आपल्या भूमिकांनी वेगळा ठसा उमटवित आहेत. श्री.साईल हे सध्या दशावतार नाट्य मंडळात विविध प्रकारच्या स्त्री भूमिका साकारत असून, त्या भूमिका सातत्यपूर्ण व रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यांच्या याच कलेची दाखल घेत, आर्ट बिट फाऊंडेशन या संस्थेने त्यांना युवा कला गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
या पुरस्काराविषयी श्रीराम साईल यांनी सांगितले की, या सर्व यशामध्ये आपले गुरुवर्य व आई वडीलांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. गुरुवर्य श्री. सचिन पालव, श्री. सुहास गावडे, मयूर गवळी, श्री. कौशल मेस्त्री यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच रसिक प्रेक्षकांची वेळोवेळी आपल्या कलेला मिळालेली साथ व आपल्या सहकारी कलाकारांच्या सहकार्याने आपल्याला हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या या यशाबद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.