You are currently viewing सिंधुदुर्गातील नेता कॅबिनेट मंत्री पदावर येत नाही तोपर्यंत शाश्वत विकास हे स्वप्नच….

सिंधुदुर्गातील नेता कॅबिनेट मंत्री पदावर येत नाही तोपर्यंत शाश्वत विकास हे स्वप्नच….

विशेष संपादकीय……

एकवेळ काँग्रेस आणि समाजवादी विचारसरणीचे प्राबल्य असलेल्या कोकणातून मातब्बर नेते राज्याच्या आणि देशाच्या इतिहासात होऊन गेले. परशुरामाच्या या पावन भूमीने देशाला आणि राज्याला अनेक हिरे दिले आहेत. राजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले मधू दंडवते, सुरेश प्रभू यांनी केंद्रात मंत्रीपदे भूषविली. काँग्रेसमधून निवडून आलेले कोकणचे नेते बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरही विराजमान झाले होते. कोकणातून मुख्यमंत्री पदी बसणारे बॅ.अंतुले हे पहिले. कोकणच्या विकासाला तिथूनच सुरुवात झाली होती. परंतु त्यानंतर कित्येकवर्षे कोकणला म्हणावे तसे प्रबळ नेतृत्व मिळाले नाही. त्यामुळे कोकणात विकासाची गंगा आली नाही.
अनेक वर्षांनी शिवसेनेच्या माध्यमातून नारायण राणे यांच्यासारखे कणखर नेतृत्व सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभले. मुंबईच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष असलेले नारायण राणे कोकणात आले आणि शिवसेना पक्षाने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली. अवघे कोकण भगवामय झाले. नारायण राणे यांना काही महिनेच मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी कोकणातील गावागावात रस्ते पोचवले. त्यामुळे कोकणचा झपाट्याने विकास व्हायला सुरुवात झाली. कोकणात नारायण राणे यांनी विकासाची गंगा आणली. युती सरकारमध्ये महसूल मंत्री, मुख्यमंत्री आणि काँग्रेसमध्ये गेल्यावर उद्योगमंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. त्यातून कोकणच्या विकासासाठी प्रयत्न केले.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर मात्र त्यांच्याकडूनही कोकणासाठी भरीव अशी कामगिरी झाली नाही. काँग्रेसमध्ये मंत्री असतानाही काँग्रेसकडून कोकणची अवहेलना झाली. त्यामुळे पुढे पुढे कोकणचा विकास खुंटत गेला. नारायण राणे सत्ताधारी भाजपाचे खासदार असूनही कोकणात म्हणावा तसा विकास होत नाही. राज्यातील सरकारमध्ये जोपर्यंत सिंधुदुर्गातील नेता कॅबिनेट मंत्रीपदावर येत नाही तोपर्यंत कोकणचा शाश्वत विकास हे स्वप्नच राहणार.
कोकणची देश पातळीवर ओळख ही नारायण राणे यांच्यामुळेच झाली. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आणि कोकणात नारायण राणे यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गात अजूनही दबदबा आहे, त्यांना मानणारा लोक वर्गही आहे. परंतु मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिल्यामुळे कोकणला अच्छेदिनची प्रतीक्षा मात्र आजही आहे.
बॅरिस्टर ए.आर.अंतुले आणि नारायण राणे यांच्या नंतर कोकणला प्रतीक्षा आहे ती कोकणचा तिसरा मुख्यमंत्री कोण होणार? नारायण राणे यांच्यानंतर कोकणातून मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारणारा असा एकही नेता दृष्टीक्षेपात दिसत नाही. कोकणातून भविष्यात तिसरा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा