*परीक्षा वेळेवरच होणार, एमपीएससीकडून खुलासा*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ३० एप्रिलला महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र या परीक्षेची प्रवेशपत्रे समाजमाध्यमांत सामायिक झाल्याचे निदर्शनास आल्याने उमेदवारांचा डेटा लीक झाल्याचा, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र एमपीएससीकडून या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे.
दरम्यान उमेदवारांचा वैयक्तिक विदा, प्रश्नपत्रिकाही फुटल्याचा दावा करण्यात आला असला तरी एमपीएससीने परिपत्रक काढून केवळ बाह्यदुव्याद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेशपत्रे फुटल्याचे सांगत परीक्षा वेळेवरच होणार असल्याचे जाहीर केले.
३० एप्रिलला राज्यभरात ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३’ ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच प्रवेशपत्रे समाजमाध्यमांमध्ये सामायिक करत उमेदवारांचा वैयक्तिक विदा आणि प्रश्नपत्रिकाही आपल्याकडे असल्याचा दावा ‘हॅकर’ने केला. या प्रकारानंतर परीक्षार्थीमध्ये खळबळ माजली. एमपीएससीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याची तातडीने दखल घेऊन एमपीएससीला परिपत्रकाद्वारे खुलासा करावा लागला. प्रवेशपत्रे २१ एप्रिलला आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर, तसेच तात्पुरत्या बाह्यदुव्याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती.
केवळ तीच प्रवेशपत्रे समाजमाध्यमात प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास आली असून त्यामुळे बाह्यदुव्याची सुविधा बंद करण्यात आल्याचे एमपीएससीने म्हंटले आहे. समाजमाध्यमांत प्रसिद्ध झालेली प्रवेशपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा ‘लीक’ झालेला नाही, याची तज्ज्ञांकडून खातरजमा करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांचा वैयक्तिक विदा, प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.