You are currently viewing निबंध स्पर्धेत, स्पर्धेपलीकडील विशेष पुरस्कार

निबंध स्पर्धेत, स्पर्धेपलीकडील विशेष पुरस्कार

सावंतवाडी :

 

शिवजन्मोत्सव २०२३ चे औचित्य साधून आई सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व मा. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरावर विविध विषयांवर व विविध वयोगटासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खुल्या गटातील “शिवाजी महाराज वैशिष्ट्ये व विचार” या विषयावर बाराशे शब्दांचा निबंध मी लिहिला. शब्द मर्यादा कमीत कमी एक हजार होती. मा. राणेसाहेब यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून विविध विषयांवर सर्व वयोगटातील सहभागी स्पर्धकांना लिहितं केल याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

खरं तर या विषयावर मी व्यक्त होतानां माझ्या स्वभावानुसार देशातील सर्वपक्षीय राजकीय मंडळींची कार्यपद्धती व महाराजांची जनकल्याणासाठीची कार्यपद्धती याबाबत तुलनात्मक एक परिच्छेद लिहिला होता. योगायोगाने या स्पर्धेचे परिक्षण करणाऱ्या मा. परिक्षक भेटल्या. त्या म्हणाल्या की “निबंध उत्तम झाला पण राजकीय भाष्य केल्याने गुण कमी झाले. मा. राणीसाहेबांनी आपला निबंध वाचण्यासाठी मागून घेतला” असो शेवटी परिक्षकांचा निर्णय हा अंतीम असो. त्यानी माझ्या निबंधातील ञुटी निदर्शनास आणल्या याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार.

या स्पर्धेमध्ये पंधराशेहून जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. काल एका विशेष सोहळ्यात या माझ्या निबंधासाठी खुल्या गटात विशेष व स्पर्धेकडील पुरस्कार देवून मा. नारायणराव राणे यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आले. माझा सन्मान करताना दादा म्हणाले ” मी तुमचा निबंध वाचला, सुंदर लिखाण करता, असेचं लिहीत रहा”, असे म्हणून त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली. धन्यवाद दादा…

आई सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मा. नारायणराव राणे, सर्व आयोजक आणि आमचे परममित्र डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे विशेष आभार.

… अॅड नकुल पार्सेकर..

प्रतिक्रिया व्यक्त करा