You are currently viewing कडावल येथे अवैद्य शस्त्र बाळगल्या प्रकरणी चार जणांना अटक

कडावल येथे अवैद्य शस्त्र बाळगल्या प्रकरणी चार जणांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

 

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक संदिप भोसले स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन सिंधुदुर्ग जिल्हयातील अवैद्य अग्नीशस्त्रांचा वापर करुन प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या अवयवांची विक्री व तस्करी करणाऱ्या इसमांची माहीती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. सदर आदेशाच्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे वेळोवेळी आढावा घेवून मार्गदर्शन करत होते. २३ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांना पांग्रड जंगलात कुडाळ येथील काही इसम कार व मोटार सायकलने जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेले असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली.

त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहा. पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी कडावल बाजारपेठेत सापळा रचून सकाळी ५:४५ वा.चे पांग्रडवरुन कुडाळकडे जाणारी एक सफेद कार व एक मोटार सायकल थांबवून तपासणी करुन त्यामधील अजित लाडोबा तांबे ( वय ५५ वर्षे, रा. वक्रतुंड कॉम्पेक्स, कुडाळ ), दत्ताराम संभाजी परब ( वय ५० वर्षे, रा. वक्रतुंड संकुल, लक्षीवाडी, कुडाळ ), सिध्देश सुरेश गावडे ( वय २४ वर्षे, रा. अणसुर, टेंबवाडी, वेंगुर्ला ), नारायण प्रकाश राउळ, ( वय- १९ वर्षे, रा. तेंडोली, खरातवाडी, कुडाळ ) यांच्या ताब्यातून दोन काडतूस बंदूका व १३ जीवंत काडतूसे हस्तगत केली.

कार मधील दोन इसम व मोटार सायकलवरील दोन इसम असे एकूण ४ इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून १ कार, १ मोटार सायकल, २ काडतूस बंदूका (ज्यामध्ये १ डबल बॅरल बंदूक व १ सिंगल बॅरल बंदूक), १३ जिवंत काडतूसे व इतर साहीत्य असे मिळून एकूण ६,१४, ०६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर इसमांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ सह कलम ३७ (१), १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत. अवैद्य शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती असल्यास त्याबाबत पोलीसांना कळविण्यात यावे, असे आवाहन देखील सिंधुदुर्ग पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा