कणकवली
तालुक्यातील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेली श्रुती देविदास वाडेकर (वय २१,रा. पेन, रायगड) ही तरुणी कोकण रेल्वे मार्गावरील एर्नाकुलम – पुणे ( ०१०५० ) या गाडीने रत्नागिरी येथे आपल्या मैत्रिणीजवळ जात होती. दरम्यान रेल्वे साकेडी येथील रेल्वे गेट जवळ आली असता ती रेल्वेतून खाली पडली असल्याची घटना शनिवारी दुपारी ३:३० वा. च्या सुमारास घडली.
या अपघातात श्रुती हिच्या हनवटी जवळ व कानाजवळ काहीशी दुखापत झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून श्रुतीला फारशी काही दुखापत झाली नाही. याबाबतची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे जवान विनोद पाटील, विराज पाटील, अजय भोई, विपुल म्हैस्के यांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले व आपल्या ताब्यातील गाडीने श्रुती हिला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अधिक उपचार सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली.
या घटनेबाबत कणकवली पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अनिल जाधव, महिला पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे, पोलिस शिपाई प्रणाली जाधव, किरण मेथे, मंगेश बावदाने, भूषण सुतार, सुरज गवाणकर, किरण कदम आदींनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत त्या तरुणीकडून घटनेबाबत माहिती घेतली. या घटनेबाबत कणकवली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत तपास सुरू असल्याने घटनेची नोंद नव्हती.