You are currently viewing रुग्णालयात दाखल वडीलांना मुलाकडून मारहाण होताना रुग्णालय कर्मचाऱ्यांचा अक्षम्य दुर्लक्ष

रुग्णालयात दाखल वडीलांना मुलाकडून मारहाण होताना रुग्णालय कर्मचाऱ्यांचा अक्षम्य दुर्लक्ष

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

 

कणकवली :

 

उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे दाखल असलेल्या वृद्ध वडीलांना त्यांचाच मुलगा काही कारणांवरून रुग्णालयातच हाताने मारहाण करतो. सदरचा प्रकार घडत असताना सोबतच्या इतर रुग्णांना त्याचा त्रास होतो, मुलाचे गैरवर्तन खटकते. परंतु रुग्णालयातील कर्मचारी मात्र घडल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून ऋग्णास मारहाण होताना हातावर हात धरून बसतात ही गोष्ट संतापजनक आहे.

आपल्या नजरेसमोर घडत असलेल्या प्रकारामुळे इतर रुग्ण व नातेवाईकांना त्रास होत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहन कदम यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फोन करून सदरच्या प्रकाराची कल्पना दिली. पोलिस आल्यावर रुग्णालयातील कर्मचारी सदर मारहाण प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना, “तुम्ही तुमच्या रुग्णाकडे जा” असे पोलिस येईपर्यंत आरामात खुर्चीत बसलेले कर्मचारी उर्मट भाषेत सांगत होते. परंतु पोलिस येण्याची वेळ येऊ न देता, रुग्णालयाच्या गार्ड ला बोलावून सदरचा मारहाण प्रकार थांबविणे रुग्णालय कर्मचाऱ्यांचे कर्तव्य होते. परंतु घडल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णालयात पोलिसांनी येऊन कारवाई करणे आवश्यक बनले. अशाप्रकारचे वागणे नक्कीच रुग्णालय प्रशासन म्हणून निंदनीय आहे.

पोलिसांनी वडीलांना मारहाण करणाऱ्या मुलाला समज देऊन सोडून दिले. मात्र असे प्रकार सरकारी रुग्णालयात घडू नये यासाठी किमान रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहन कदम यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा