You are currently viewing क्रीडाप्रेमी आम. सुनील राऊत आयोजित व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट “आमदार चषक” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा- २०२३

क्रीडाप्रेमी आम. सुनील राऊत आयोजित व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट “आमदार चषक” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा- २०२३

राजमाता जिजाऊ, शिवशक्ती महिला, स्वराज्य स्पोर्ट्स महिलांत, तर भारत पेट्रोलियम, मिडलाईन, मुंबई पोलीस, आयकर-पुणे पुरुषांत ” आमदार चषकाच्या” बाद फेरीत.

 

मुंबई :- क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित केलेल्या “आमदार चषक” कबड्डी स्पर्धेच्या स्थानिक महिला गटात राजमाता जिजाऊ, शिवशक्ती महिला, स्वराज्य स्पोर्ट्स यांनी, तर भारत पेट्रोलियम, मिडलाईन, मुंबई पोलीस, आयकर-पुणे यांनी व्यावसायिक पुरुषांत बाद फेरी गाठली. कांजूर मार्ग(पूर्व) येथील परिवार मनोरंजन मैदानावर मॅटवर घेण्यात आलेल्या महिलांच्या ब गटात पुण्याच्या  राजमाता जिजाऊने उपनगरच्या संघर्षचा ६२-१४ असा सहज धुव्वा उडविला. मध्यांतराला ३४-०६ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या राजमाताने नंतरही तोच जोश कायम ठेवत गुणांचे अर्धशतक आरामात पार केले. सलोनी गजमाल, साक्षी रावडे, प्रियांका मागंलेकर या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. संघर्षाच्या प्रणाली नागदेवताचा अपवाद वगळता इतर कोणाची मात्रा चालली नाही. राजमाता जिजाऊ व शिवशक्ती महिला हे दोन संघ या स्पर्धेच्या विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहेत.

शिवशक्तीने अ गटात नवशक्ती स्पोर्ट्सचा ४६-१२ असा पराभव करीत आपली डावेदारी आणखी पक्की केली. विश्रांतीला २३-०४ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने तोच जोश कायम ठेवत ३४ गुणांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला. पूजा यादव, रिया मडकईकर, क्रिया निकम यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. नवशक्तीची गायत्री देवळेकर चमकली. स्वराज्य स्पोर्ट्सने ड गटात कोल्हापूरच्या जिजाऊचा ५९-१४ असा सरळ पाडाव केला. पूर्वार्धात २७-०७ अशी मोठी आघाडी घेणाऱ्या स्वराज्यने उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. याशिका पुजारी, सानिया इंगळे यांच्या चढाई-पकडीच्या चौफेर खेळामुळे हा विजय सोपा गेला. जिजाऊची ऐश्वर्या गावडे बरी खेळली.

व्यावसायिक पुरुषांच्या ब गटात भारत पेट्रोलियमने साई सिक्युरिटीला २९-१७ असे नमवित बाद फेरीतील आपला मार्ग मोकळा केला. अक्षय सोनी, रोहन उके यांच्या झंजावाती खेळामुळे हा विजय सहज शक्य झाला. साईचा ऋतिक छेडा एकाकी लढला. रायगडच्या मिडलाईनने प्रोटीन होम्सला ५१-२६ असे नमवित बाद फेरी गाठली. पहिल्या डावात २३-१४ अशी आघाडी घेणाऱ्या मिडलाईनने दुसऱ्या डावात आपला खेळ गतिमान करीत गुणांचे अर्धशतक गाठले. नितीन धनकर,सुगरीव पुरी यांच्या चौफेर चढाया त्यांना नितीन देशवाले याची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. पराभूत संघाचा साहिल कदम एकाकी लढला. पुण्याच्या आयकरने क गटात मुंबई पोलीसचा ४८-३८ असा पराभव केला. पण या गटातून दोन्ही संघांनी बाद फेरी गाठली. आयकरच्या विजयात निलेश साळुंखे, रोहित मदने, अजय आहेर यांचा खेळ महत्वपूर्ण ठरला. मुंबई पोलीस संघाकडून धीरज तरे, अमित राघवन उत्कृष्ट खेळले.

प्रतिक्रिया व्यक्त करा