You are currently viewing शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बोंडू प्रक्रियेसाठी ब्राझील तंत्रज्ञानाचा वापर करा – मंत्री दीपक केसरकर

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बोंडू प्रक्रियेसाठी ब्राझील तंत्रज्ञानाचा वापर करा – मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू पिकाचे उत्पादन होते. या पिकापासून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कशा प्रकारे देता येईल यासाठी ब्राझिलच्या तंत्रज्ञानाचा वापर काजू बोंड प्रक्रियेसाठी करावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या.*म

काजू फळपीक प्रकिया,सिंधुरत्न समृध्द योजना,माजगांव धरणासंदर्भात भूसंपादन व जलसंधारण विभागाची आढावा बैठक शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी चिपी विमानतळावर घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वर्षा शिंगण-पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना खरमाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत जावडेकर आदी उपस्थित.
श्री. केसरकर म्हणाले, काजू बोंड प्रक्रियेवरील संशोधनासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला निधी देण्यात आला होता. हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे काजू बोंड हे फुकट जाते. त्याचा पुन:वापर होत नाही. यासाठी ब्राझीलचे पथक वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रामध्ये आले होते. हे तंत्रज्ञान मान्य झाल्यास शेतकऱ्यांना याचा निश्चीतच फायदा होईल. यासाठी सिंधुरत्न समृध्द योजनेमधून निधी जाईल. ज्यूससाठी चिलींग टँकर, डीप फ्रिजर द्यावे लागतील त्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करा. ज्यूस काढल्यानंतर शिल्लक राहणारा काजू बोंड सोलरचे वाळवून त्यापासून पशूखाद्य बनू शकते. शिवाय फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे कुकीजमध्येही त्याचा वापर करता येईल. त्यादृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही सुरु करावी.
जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग विमानतळ सुरु झाले आहे. या ठिकाणी एव्हिएशन कॉलेज सुरु करण्याबाबत अधिकाऱ्यांनी विचार करावा.जवळच्या विमानसेवा सुरु करण्याबाबतही प्रयत्न करावा. असे, सांगून श्री. केसरकर म्हणाले, या जिल्ह्याचे सागर किनारे मुख्य आकर्षण आहे. त्याबरोबर आंबोली, तिलारी जिल्ह्यातील विविध किल्ले यांचे हवाई पर्यटन करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यात 7 ते 8 ठिकाणी हेलीपॅड तयार करण्याबाबत विचार व्हावा. तेरेखोल नदी स्वच्छ करण्याच्या दृष्टीकोनातून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात यावी त्यानंतर ते सांडपाणी नाल्यामध्ये सोडण्यात यावे.
माजगाव धरणाचे काम तातडीने सुरु करण्यासाठी स्थानिक जनतेशी चर्चा करण्यात यावी व पावसाळ्यापूर्वी या धरणाचे काम सुरु करण्यात यावे, असे सांगून श्री. केसरकर म्हणाले, सर्वच नगरपालिकांनी महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्माण करावा त्यादृष्टीने अहवाल तयार करावा. सावंतवाडी नगरपरिषदेने मोती तलावातील गाळ काढून दोन्ही गेटची दुरुस्ती करावी. कृषी विभागाने फुड सिक्युरिटी आर्मीची निर्मिती करुन कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न करावे व 15 हेक्टरचे उद्दिष्ट ठेवावे असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा