You are currently viewing जनतेचं आपण देणं लागतो हे ध्यानात ठेवून काम करत राहा : निलेश राणे

जनतेचं आपण देणं लागतो हे ध्यानात ठेवून काम करत राहा : निलेश राणे

जनतेचं आपण देणं लागतो हे ध्यानात ठेवून काम करत राहा : निलेश राणे

सावंतवाडी

सावंतवाडीतील गांधी चौकात अनेक सभा झाल्या असतील. निवडणूकांमधून झालेल्या सभांमध्ये टीका टिप्पणी झाली असेल. काही लोक केवळ एकमेकांवर टिका करण्यासाठी सभा घेतात. मात्र, भारतीय जनता पार्टी हा केवळ एकमेव पक्ष आहे जो आम्ही जनतेसाठी किती निधी आणला हे सांगण्यासाठी सभा घेत आहे हे खरचं कौतुकास्पद आहे. कारण आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत. जनता आहे म्हणून आपण आहोत. शेवटी जनताच ठरवत असते की कोणाला खासदार व आमदार करावं. ज्याच्या नशिबात आहे त्याला नक्कीच संधी मिळेल. मात्र, आपण जनसेवक या नात्याने ज्या जनतेने आपल्याला भरभरून दिलं त्या जनतेचं आपण देणं लागतो हे ध्यानात ठेवून काम करत राहा, असा मौलिक सल्ला भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी दिला.

भारतीय जनता पाटीच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या ‘महाविजय अभियाना ‘ च्या निमित्ताने बुधवारी येथील गांधी चौकात समारोप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविकपर भाषणात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली बोलत होते.यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवराज लखमराजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, युवा नेते विशाल परब, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगांवकर, मंडल अध्यक्ष महेश धुरी, प्रभाकर सावंत, संघटन मंत्री शैलेश दळवी, रणजित देसाई, प्रमोद कामत, मनोज नाईक, सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, महिला प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत यांसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

माजी मुख्यमंत्री नारायण राणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना म्हणजे २०१४ पर्यंत या जिल्ह्यात सहज पैसे येत होते. मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. पाच वर्षे मी जिल्हा नियोजन सभागृहात असायचो. त्यांचा वेगळा दरारा व रुबाब होता. अधिकारी वचकून असायचे. त्यांच्याकडे वेगळं काही मागावं लागत नव्हत. एवढा निधी व प्रकल्प जिल्ह्यासाठी येत होता. मागील आठ वर्षात त्याला ब्रेक लागला होता. मात्र, आता पून्हा एकदा रविंद्र चव्हाण यांच्या रुपाने कार्यकुशल पालकमंत्री जिल्ह्याला लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी येऊ लागला आहे.

माझ्या नशिबात मी अगदी कमी वयात देशाचं सर्वात मोठं सभागृह अनुभवलं. मी खासदार असताना मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्या काळी १० लाख कोटी बजेट झाल्यावर मोठा गवगवा करण्यात आला होता. मात्र, नरेंद्र मोदी यांनी हे बजेट २४ लाख कोटींवर नेलं. केवळ चौदा वर्षात हे बजेट १४ लाख कोटींनी वाढवणं ही साधी सोपी गोष्ट नाही. विकासाचा ध्यास घेतल्यानेच हे शक्य झाले, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

प्रशासन चालवणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. त्याच्यासाठी कोणीतरी रुबाबदार व वजनदार माणूस लागतो. सरकार असचं चालत नाही. मागील अडीज वर्षात आपण ते अनुभवलं होत. कोरोनाच्या नावावर जिल्ह्याचा मंजूर निधी मागे गेला. ग्रामपंचायतचा निधीही परत घेण्यात आला. मात्र, आज बदल झालाय. पैसा यायला लागलाय त्याचबरोबर हिंदूचे सणही साजरे व्हायला लागले आहेत. या राज्याबरोबरचं या जिल्ह्यालाही आता वैभव प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह या विधानसभा मतदार संघातील महेश सारंग, संजू परब यांनी हे महाविजय अभियान यशस्वी पणे राबवलं. त्याचे मनापासून अभिनंदन. आज राजन तेलींनी सगळचं मागीतलं. सावंतवाडी मतदार संघांसाठी ही पॅकेज मागितलं. मात्र, केवळ लावंतवाडीच नको तर आम्हाला कुडाळ व कणकवली मतदार संघासाठीही द्या, आमच्याकडेही लक्ष ठेवा अशी कोटीही त्यांनी केली.

अर्जून तेंडुलकरने वडिलांची पुण्याई न घेता स्वतः ला सिद्ध केलं : निलेश राणे
काल आयपीएल मध्ये अर्जून तेंडुलकरने स्वतःला स्वकर्तृत्वावर सिद्ध केलं. दोन वर्ष संघात समावेश असूनही प्रत्यक्ष मैदानावर उतरण्याची संधी मिळत नसताना वडिलांच्या वशिल्यावर तो पूढे गेला नाही. तसेच सचिन तेंडुलकर यांनीही आता मी निवृत्त होतोय मला सांभाळलतं तसं माझ्या मुलालाही सांभाळा असं आवाहन केलं नाही. उलट अर्जून तेंडूलकर याने स्वतः पहिली विकेट घेऊन व उत्कृष्ट गोलंदाजी करून वडिलांच्या पुण्याईवर न येता स्वतः कष्ट घेऊन स्वत:ला सिद्ध केलं, अशा शब्दांत निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबाचा समाचार घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा