You are currently viewing नियोजित संकेश्वर-बांदा हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून नेण्यात यावा….

नियोजित संकेश्वर-बांदा हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून नेण्यात यावा….

पर्यटन महासंघा तर्फे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन सादर

सावंतवाडी

नियोजित संकेश्वर-बांदा हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून नेण्यात यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. यावेळी महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, सावंतवाडी अध्यक्ष जितेंद्र पंडित, सचिव प्रसाद कोदे आदी उपस्थित होते.

मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग तसेच कोकण रेल्वेचे सावंतवाडी स्थानक सावंतवाडी शहराच्या बाहेरून गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी सावंतवाडी शहराकडे पाठ फिरवली आहे. सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. सावंतवाडी ही पूर्वीच्या सावंतवाडी संस्थांची राजधानी तसेच हस्तकलेचे जागतिक केंद्र आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वे स्थानकही शहराच्या दूरवर गेल्याने पूर्वीप्रमाणे पर्यटक या शहरात येत नाहीत.

सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक सांस्कृतिक तसेच कलाकारांचे शहर आहे. इथल्या लोक कलेला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळाले आहे. या या ठिकाणच्या खाद्य संस्कृतीलाही पर्यटकांनी यापूर्वीही भरभरून प्रतिसाद दिला होता. परंतु गेली काही वर्षे पर्यटकांचा ओघ या शहराकडे कमी प्रमाणात येत असल्याने सावंतवाडी शहरातील व्यापार तसेच हस्तकला बाजारपेठेवर फार मोठा परिणाम झाला आहे. ही गोष्ट  सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या कानी घातली. या शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी नियोजित राष्ट्रीय महामार्ग हा सावंतवाडी शहरातून जाण्याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या राष्ट्रीय महामार्ग बरोबरच शहरातील तसेच तालुक्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांकडे रस्तेही दर्जेदार करावेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन रोप्य महोत्सवात सावंतवाडी तालुक्याला भरघोस असे झुकते माप द्यावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + three =