You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा – रवींद्र चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा – रवींद्र चव्हाण

सावंतवाडी

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते झाराप या महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यावीत, आणि होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आज मुंबई येथे त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावरून आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नवी मुंबई येथील कोकण भवन मधील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मुंबई- गोवा महामार्गाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गुहागर चिपळूण कराड रस्त्याच्या चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक ते कुंभार्ली घाटमाथा (हेळवाक) एकूण २१. किमी या भागाचे दुपदरीकरण करुन उन्नतीकरण करावयाचा प्रस्ताव मंजूर करुन संबंधित काम चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन रस्त्याची कामे मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी मुख्य अभियंता, रस्ते परिवहन मंत्रालय व मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांना दिल्या.

चिपळूण पागनाका (७०० मी.) व सावर्डे शहरामध्ये उड्डाण पुलाचा (१२५० मी.) प्रस्ताव चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन उड्डाण पुलांची कामेही मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.

कोकणातील महामार्गांवरील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देण्याच्या दृष्टीने खालील कामे चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये मंजुर करुन घेऊन चालु आर्थिक वर्षात ही कामे सुरु करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. या कामांमध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग वडखळ रस्ता ००.०० ते २२.२०० चे महामार्ग दर्जाच्या स्तराला उन्नतीकरण करणे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी चे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६.३७ कि.मी. लांबीचे काम मंजुर असुन उर्वरीत १४.३० कि.मी. चे उन्नतीकरण करण्याच्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा