ॲपच्या माध्यमातून सेवा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत
सावंतवाडी
कोलगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-कोलगाव’ या मोबाईल अॅपचा लोकार्पण सोहळा बुधवारी एकूण १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीत गांधी चौक येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्यासह जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या अॅपच्या माध्यमातून कोलगाववासियांना घरबसल्या सर्व प्रकारचे दाखल्यांसह सुविधा उपलब्ध होणार आहेत.
अशा प्रकारच्या ॲपच्या माध्यमातून ग्रामस्थांना दाखल्यांसह सुविधा देणारी राज्यातील व जिल्ह्यातील कोलगाव पहिली ही ग्रामपंचायत आहे. या अॅपच्या माध्यमातून कोणत्याही ग्रामस्थाला आपले दाखले थेट ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. त्यासाठी त्याला ग्रामपंचायतीमध्ये जाण्याची गरज नाही तसेच सरपंच किंवा ग्रामसेवक नसला तरी त्याचे काम होणार आहे. या ठिकाणी अॅपवर मागणी केल्यानंतर संबधित उमेदवाराला थेट डिजिटल सिग्नेचर असलेला दाखला मिळणार आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कोलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.