You are currently viewing शेतमाल उत्पादक व ग्राहक यांना काय हवे आहे यासाठी ‘ विकेल ते पिकेल’ अभियान सुरु….

शेतमाल उत्पादक व ग्राहक यांना काय हवे आहे यासाठी ‘ विकेल ते पिकेल’ अभियान सुरु….

 – प्रकल्प संचालक (आत्मा)

सिंधुदुर्गनगरी 

शेतमालाच्या उत्पादकाला व ग्राहकाला काय हवे आहे. याचा शोध घेऊन त्यानुसार पिक पध्दती, कृषि प्रक्रिया, पुरवठ्याची साखळी व विक्री व्यवस्था विकसित व मजबूत करण्यासाठी ‘ विकेल ते पिकेल’ अभियान सुरु करण्यात आले, असल्याची माहिती प्रकल्प संचालक (आत्मा) सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

            बाजारात मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीवर भर देणे, शेती पिकाचे अधिक दर्जेदार व गुणवत्ता मुल्यसाखळी विकास, प्रकल्पाच्या माध्यमातून बाजाराच्या वाढीव संधी उपलब्ध करणे, कृषि व्यवसाय सुलभतेसाठी धोरणात्मक बदल करणे, कृषि क्षेत्रात गुंतवणूक वाढविणे, शेती उत्पन्नात शाश्वतता आणणे व निव्वळ उत्पन्नात वाढ करणे आदी योजना ‘ विकेल ते पिकेल’ अभियानात राबविण्याचे उद्दिष्ट आहे.

            शेतकरी सध्या घेत असलेल्या पिकांची, शेतमालाची प्रचलित विपणन व्यवस्थेशिवाय थेट ग्राहकांशी जोडणी करणे, शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहचविताना अस्तित्वात असलेल्या साखळीतील टप्पे कमी करणे, विक्री तंत्रज्ञानासाठी आवश्यक किमान दर्जा, प्रतवारी, स्वच्छता व सुकविणे या सारख्या कमी खर्चाच्या परंतू दरात खुप फरक करणाऱ्या घटकांसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  या अभियानात ताजा शेतमाल, भाजीपाला, फळे, याची थेट गाव, तालुका, जिल्हा, नगरपालिका क्षेत्र, गृहनिर्माण संस्था, राष्ट्रीय महामार्ग इत्यादी ठिकाणी विक्री करणे, विक्रेते, खरेदीदार निवडुन त्यांना शेतमालाची विक्री करण्यासाठी विक्रेता, खरेदीदार, बाजार, व्यवस्थेची निवड करणे या पायाभूत सुविधेसह प्रक्रियायुक्त शेतमालाची विक्री करणे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

            ‘ विकेल ते पिकेल’ अभियानाच्या अंमलबाजावणीसाठी कृषि व संलग्न विभागाच्या तसेच सहकार, पणन,नाबार्ड इत्यादी विभागाच्या विविध योजनांची सांगड घालून हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात विविध योजनेंतर्गत शेतकरी गटांना त्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणारआहे.तसेच या गटांच्या मालाच्या विक्रीसाठी प्रक्रियादार, निर्यातदार, सहकारी भांडार, गृहनिर्माण संस्था, यांना जोडण्यात येणार आहे. यामध्ये सक्षमपणे काम करणाऱ्या गटांची निवड करुन त्यांची शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी एकात्मिक फलोउत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातर्गंत मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी या योजनेतून प्राधान्य देण्यात येणार आहे.

            ‘ विकेल ते पिकेल’ अभियानाच्या अंमलबजावणी करीता मार्गदर्शन, प्रकल्प मंजुरी व देखरेखीसाठी जिल्हास्तरावर मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षीय जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असल्याचेही प्रकल्प संचालक (आत्मा) सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + thirteen =