You are currently viewing वजाबाकीचं गणित

वजाबाकीचं गणित

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित लिखित अप्रतिम लेख*

*वजाबाकीचं गणित*

आयुष्यात कुणालाच, कधीच वजाबाकीचे गणित आवडत नसते,करता आलीच वजाबाकी तर दुःखाची व्हावी अशीच प्रार्थना सगळेजण करतात. आणि त्यात काहीही वावगे नाहीच मुळी. आनंदाची ,सुखाची अपेक्षा करणे, त्यासाठी प्रार्थना करणे एवढ्यावरच न थांबता त्यासाठी प्रयत्न करणेदेखील आवश्यक आहे. आपण सगळेच जण सकाळपासून रात्रीपर्यंत न थकता धाव धाव धावतो आहे ते कशासाठी? तर या सुखासाठीच ना? प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण सुखी व्हावा म्हणून तर ही सगळी धडपड चालू असते.कुणी स्वतःसाठी, कुणी दुसऱ्या कुणासाठी,तर कुणी समाजासाठी…असे नाना प्रकार त्यात दिसतात. स्वतःसाठी लढणारे,धडपडणारे तर बरेच लोक असतात. काही दुसऱ्याच्या चेहर्यावरचे सूख, समाधान,हसू पाहून आनंद मिळवणारे लोकही असतात. त्यात आपल्या घरचा, कुटुंबातील, मायेचा गोतावळा असतो. काही जण समाज सुखी व्हावा म्हणून धडपडतात,ते खरंच लोकविलक्षण असतात.सामान्य लोकांच्या कुवतीबाहेरचा विचार करणारी, उद्याच्या सुंदर जगाचे स्वप्न पाहणारी अशी समाजसुधारक माणसे तशी विरळाच म्हणावी लागतील.

पण या सर्वांमध्ये एक गोष्ट नक्की समान आहे की प्रत्येकजण कुणाला ना कुणाला जीव लावतो आहे,प्रेम करतो आहे.भले तो दरवेळी तसे सांगत नसेल पण त्यांच्या कृतीतून ते नक्कीच कळत असते. आपल्या स्वतःला असूदे किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला असूदे सुखात ठेवण्यासाठी केलेली प्रत्येक योग्य गोष्ट ही त्याची तुमच्यावरच्या प्रेमाची पावतीच असते.आपण कुठल्या घरात कुणाच्या पोटी जन्म घेऊ,आपले भाऊ बहीण, नातेवाईक कोण असतील,कुणाशी लग्न होईल,मुलं कशी निघतील इतकेच काय शेजारी कसे मिळतील हेसुद्धा आपल्या हातात नसते. या नात्यांशी आपली नाळ जुळलेली असते म्हणून ते आपल्या आयुष्यात येतात,लळा लावतात…पण एक दिवस कसे अचानक दिसेनासे होतात,कळतच नाही की कुठे शोधावं म्हणजे सापडतील. अगदी लहान मूल सुद्धा झोपेला आले की किरकिर करायला लागते ते त्याला एकटेपणाची भीती वाटत असते म्हणूनच. एकदा झोप लागली की आपण तसेही एकटेच उरतो. पण उठल्यावर आपल्याला सोबतीची नितांत गरज असते.आता काही वेळापूर्वी आपण त्यांना हाक मारत असतो, बोलत असतो..कशी जातात आपल्याला एकटं सोडून ही माणसं? कोण नेतं त्यांना? कुठे नेतं? आणि का परतून येत नाहीत ते?… खूप खूप अकल्पित त्रासदायक दुःख असतं हे. तुम्हाला जीव लावून अशी एक्झिट घेण्याचा कुणाला काय अधिकार आणि कुणी दिला?आयुष्यातून माणसांची अशी एकाएकी वजाबाकी करणं खरंच इतकं सोप असतं का? त्या क्षणी झालेली हृदयाची वाताहात कुणाला तरी कळू शकते का? आत्ता क्षणापूर्वी बोलत असताना पुढच्या क्षणाला ती व्यक्ती आपल्यात नसावी हे शब्दांच्या पलीकडचे दुःख इथं प्रत्येकालाच सहन करावे लागते. मृत्यू बघत नाही तुम्ही गरीब आहात का श्रीमंत, तुम्ही स्त्री आहात का पुरुष, का तुम्ही बाळ आहात, तुम्ही काळे आहात का गोरे… त्याचा न्याय सर्वांसाठी सारखाच असतो. पण ज्याच्या वाट्याला ही जीवघेणी वजाबाकी येते त्याला तो क्रूरच वाटतो. मलाच का? माझ्याच बाबतीत हे का घडलं? असे प्रश्न रात्रंदिवस छळत राहतात पण उत्तरे कोणाकडेच नसतात. कोणी रडून मोकळा होतो कोणी आक्रोश करून तर कोणी स्वतःला दोष देत राहतो. जे घडलं त्यात स्वतःची चूक समजून तो अपराधी भाव मनात ठेवून कुढत राहतो. कोणी आतल्या आत दुःखाचे कढ गिळत राहतो. आतमध्ये साचून राहिल्यावर दुःखही चिघळतं आणि ठसठसणारी भळभळणारी जखम सतत ओलीच राहते. कितीही मनातून काढून टाकायचे ठरवले तरी आठवणींना कोणी लगाम घालू शकते का? त्या सैरभैर झालेल्या आठवणींचे डंख पुन्हा पुन्हा जखमेवर आदळत राहतात. आणि का दूर जावं या आठवणींपासून? आपल्याच मायेच्या माणसाच्या असतात ना त्या? लोकांना वाटूच शकतं तेव्हा आपल्या वागणं भ्रमिष्ट सारखं, पण हेही तितकच खरं की ज्याचं दुःख त्यालाच कळतं आणि त्यालाच जाळतं देखील. सीमेवर शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडलेला जवान जेव्हा तिरंग्यात लपेटून दाराशी येतो तेव्हा काय अवस्था होत असेल त्याच्या आईची, पत्नीची, मुलांची? ध्यानीमनी नसताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातलगांनी कुणाकडे जाब मागावा? माणूस कितीही आजारी असेल तरी त्याच्या जवळच्या माणसांना तो हवाच असतो म्हणून तर हॉस्पिटलच्या न झोपणाऱ्या वाऱ्याही करताना तो थकत नाही. पूर, भूकंप अशा आपत्ती तर घरादारासकट माणसाला ओढून नेतात. तसंही मृत्यू कुठल्या स्वरूपात कुठे कुणाला कधी येऊन भेटेल हे गूढच आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे माणूस अजूनही छोटाच आहे, य:कश्चित आहे हे मान्य करावेच लागेल.

पण काळ हेच औषध असते या दुखावर हे सुद्धा खोटे आहे. काळ जातो तसे माणूस फक्त सराव करतो दुःख लपवायचा, मुखवटे घालून फिरायचा… बाकी आत मध्ये जे काही जळत असते ते रोज रोज कुणाला बोलून दाखवणार? त्याला ते दाबून जपून आपल्यापुरतेच ठेवावे लागते. वजाबाकीचे गणित चटका लावून तर जातेच पण आपल्याही जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. अश्वत्थाम्याप्रमाणे ही भळभळती जखम आपल्या अंतापर्यंत आपल्याला सोबत करतच राहते.

@अंजली दीक्षित
९८३४६७९५९६

 

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा