You are currently viewing ९ सप्टेंबर डॉ. मोतीलाल राठी यांच्या जयंतीनिमित्ताने…

९ सप्टेंबर डॉ. मोतीलाल राठी यांच्या जयंतीनिमित्ताने…

 *डॉ. मोतीलाल राठी एक देव माणूस*

==============

आज ९ सप्टेंबर डॉ. मोतीलाल राठी यांच्या जयंतीचा दिवस .डॉ. राठी यांनी आमच्यावर मुलासारखे प्रेम केले. त्यांच्यामुळे माझे. सौ. विद्याचे तसेच शोभाताईंचे जीवन घडले. हा माणूस जर आमच्या जीवनात आला नसता तर कदाचित आम्ही आजच्या पदावर आहोत किंवा आम्ही आमच्या आपापल्या क्षेत्रात जी प्रगती केली आहे ते करू शकलो नसतो. डॉक्टर साहेबांची मुलं तर बाहेर शिकायला होती .त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याचे कारण ही नव्हते. पण प्रवीणच्या आणि प्रतीकच्या वाट्याला येणारे प्रेम त्यांनी आमच्या परिवाराच्या पारड्यात टाकले .एवढेच नव्हे तर आमच्याबरोबर किशोर फुले, साहेबराव थोरात, जी सुरेशन या मित्रांना त्यांनी आयुष्याच्या वळणावर समर्थ साथ दिली व त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले .आज आम्ही जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा डॉक्टर साहेबांच्या बाबतीत” झालेत बहु होतील बहु परंतु या सम हा.” असेच म्हणावे लागेल. डॉक्टर साहेब तसे नात्याने आमच्या सातेगावचे जावई .मी सातेगाव चा राहणारा .योगायोगाने कासट परिवार व आमचे ऋणानुबंध खूप जवळचे. त्याच कासट परिवारातील कमलताईंशी डॉक्टरांचे लग्न झाले .कासट परिवारामुळे माझे वडील अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून रुजू झाले. पुढे मीच या महाविद्यालयामध्ये माझे शिक्षण पूर्ण केले .डॉक्टर या संस्थेचे पदाधिकारी. पण त्यांना साहित्याची प्रचंड आवड. आणि मी तर सतत साहित्यामध्ये रमणारा माणूस. त्यामुळे आमची मैत्री जमली. ती इतकी घट्ट झाली ही एक वेळ केशरबाई लाहोटी मध्ये प्राचार्य पदाची जाहिरात निघाली. एक मारवाडी प्राध्यापक माझ्याकडे आले .डॉक्टरसाहेब तेव्हा संस्थेचे अध्यक्ष होते. श्री गणेशदास राठी छात्रालय समिती ही अमरावती मधील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था. ते मारवाडी प्राध्यापक मला म्हणाले. मी प्राचार्य पदासाठी अर्ज भरलेला आहे. तुम्ही कृपा करून डॉक्टरांजवळ माझ्या नावाची शिफारस करा. मी त्यांना म्हणालो .तुम्ही मारवाडी. डॉक्टर साहेबपण मारवाडी. तुम्हीच का नाही जात .तेव्हा ते मला म्हणाले नाही,डॉक्टर साहेब आमच्यापेक्षा तुमचे जास्त ऐकतात .मी थक्क झालो. त्या प्राध्यापकाला आमच्या ऋणानुबंधाची इतकी घट्ट पकड असलेली माहीत होते.सन १९७४ ला माझे वडील केशरबाई लाहोटी म.वि.च्या सेवेत असताना वारले .मी तेव्हा विदर्भ महाविद्यालयामध्ये मराठीमध्ये एम ए करीत होतो. डॉक्टर साहेबांनी पुढाकार घेऊन मला सात दिवसात नोकरीला लावून घेतले. मी जरी त्यांच्या महाविद्यालयामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून लागलो तरी डॉक्टरसाहेब मला त्यांच्या घरी डायनिंग टेबलवर जेवण करायला त्यांच्या बाजूला बसवायचे. बरोबरीने समानतेची वागणूक द्यायचे. पुढे माझे एम ए पूर्ण झाले. मी विद्यापीठात पहिला आलो .डॉक्टरसाहेबांनी सगळे नियम बाजूला ठेवून मला प्राध्यापक केले .त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. अनेकांचे बोलणे सहन करावे लागले. पण ते सगळे त्यांनी माझ्यासाठी सहन केले आणि त्यावेळेसचे अध्यक्ष श्री शंकरलालजी राठी हे देखील डॉक्टर साहेबांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले .आमच्या सगळ्या साहित्यिक मित्रांची साहित्य संगम ही संस्था. बबन सराडकर,शिवा इंगोले,अरुण सांगोळे, गंगाधर पुसतकर, कविता डवरे, सुनील झोड,राज यावलीकर,अशोक थोरात ही सगळी आज नावलौकिकास आलेली मंडळी साहित्य संगममध्ये होती. तेव्हा आमचे कार्यक्रम मालटेकडीवर व्हायचे. तेव्हा मालटेकडीवर मोठ मोठे दगड होते .त्या दगडावर बसून आमचे कवी संमेलन व्हायचे. पुढे त्यात थोडी सुधारणा झाली. आम्ही नेहरू मैदानातील कस्तुरबा उद्यान हे कार्यक्रमासाठी निवडले आणि पुढे डॉक्टर साहेबांचा परिचय झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आपला टेनिसचा हाँल आमच्या हवाली केला. त्यांच्या टेनिसच्या हॉलमध्ये आमचे कवी संमेलन कार्यक्रम व्हायला लागले .विशेष म्हणजे हे कार्यक्रम होत असताना डॉक्टरांची भूमिका तसेच सौ कमलताईची भूमिका ही कार्यकर्त्यांची होती .आल्या गेल्या लोकांचे स्वागत .चहापान. अल्पोपहार हे डॉक्टरसाहेब स्वतः जातीने पाहत होते. प्रतीक आणि प्रवीण त्यांना मदत करायचे. डॉक्टरांची गाडी, डॉक्टरांचा बंगला तसेच डॉक्टरांचे पैसे पण सदैव आमच्या मदतीला यायचे. आमच्या साहित्यिक परिवारातील लोकांकडून डॉक्टरांनी तपासण्याचे पैसे घेतल्याचे मला तरी आठवत नाही .तसा हा देव माणूस. सुरेश भट हे त्यांचे जवळचे मित्र. डॉक्टरसाहेबांमुळे सुरेश भट यांचा परिचय झाला आणि आमच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा चढला. कारण सुरेश भटांनी देखील त्यांच्या आयुष्यातील काही दिवस आमच्या तपोवनतील घरी घालवले डॉक्टरसाहेबांचे घर त्या घराचे गेस्ट हाऊस हे सदैव साहित्यिक लोकांसाठी बैठकीचा अड्डा ठरलेले होते .आजकाल कोणीही साहित्यिक आले, पाहुणे आले की हॉटेलमध्ये ठेवण्याची संस्कृती आहे.पण अमरावतीला कुठलाही कार्यक्रम असो तर हृदयनाथ मंगेशकरचा असो विठ्ठल वाघ यांचा असो सुरेश भटांचा असो मिर्झा रफी बेगचा असो की शंकर बडेचा असो डॉक्टरसाहेबांचे रेस्ट हाऊस तन-मन-धनासह त्यांच्या सेवेत असायचे .अमरावतीला अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन झाले .तेव्हाचा काळ हा पन्नास वर्षांपूर्वीचा .उषाताई चौधरी तेंव्हा खासदार होत्या. त्या स्वागताध्यक्ष होत्या. कार्याध्यक्ष पदाची माळ आम्ही डॉक्टर मोतीलाल राठी यांच्या गळ्यात घातली आणि खऱ्या अर्थाने हे संमेलन यशस्वी होण्यासाठी डॉक्टरसाहेब तन मन धनाने झिजले आणि संमेलन यशस्वी करून दाखविले.

तपोवनवर तर त्यांचा मनापासून जीव. ज्या काळात तपोवनला जायला लोक घाबरत. त्या काळात तपोवनला जाऊन तिथले रुग्ण तपासून त्यांच्यावर इलाज करण्याचं काम औषधोपचार करण्याचे काम डॉक्टर मोतीलाल राठी करीत होते .शेवटचा श्वास घेईपर्यंत ते हे काम करीत राहिले .साहेबराव थोरात आमच्यापैकी एक चांगला कवी होता .पण त्याला नोकरी नव्हती .चित्रा टॉकीज मध्ये गेट कीपरची जागा होती. तो मला म्हणाला की ते ओळखी मागताहेत. तू माझ्यासाठी डॉक्टर मोतीलाल राठी कडे शब्द टाक. मी त्याला डॉक्टरसाहेबकडे घेऊन गेलो .डॉक्टरसाहेब म्हणाले अरे हा तर चांगल्या कविता करतो .याला आपण आपल्या संस्थेमध्ये नोकरी देऊ या. त्यांनी लगेच संस्थेचे काम पाहणारे श्री हरिरामजी इंदानी यांना फोन केला व लगेच त्याला एस.एल.हायस्कूल वलगाव येथे प्रयोगशाळा सहाय्यकाची नोकरी लावून दिली. आमचे एक मित्र होते .जी सुरेशन त्यांचे नाव. त्यांना हृदयाचा त्रास व्हायला लागला. डॉक्टरसाहेबांनी कळले. साहेबांनी त्यांना तपासले व एक दिवस डॉक्टर साहेब माझ्याकडे आले. मला म्हणाले जी सुरेशन यांचे घर कुठे आहे. आम्ही गेलो आणि कमी पैशांमध्ये ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर साहेबांनी तजवीज केली होती. त्याची कल्पना त्यांना दिली. माझ्या घरी येतात काय ? जी.सुरेशनकडे नेतात काय ? त्यांच्या ऑपरेशन साठी सोय करतात काय? हे सगळं अदभूत होतं. हे सगळं आज आठवलं की आमच्या डोळ्यातून नकळत अश्रू येतात. हा हिमालयासारखा माणूस आमच्या गावात होऊन गेला हे पाहून मन गहिवरून येतं .श्रीमती केशरबाई महाविद्यालय मध्ये दरवर्षी हिंदी कवी संमेलन व्हायचं आणि ते खूप गाजायचं. पण डॉक्टर साहेबांनी हिंदी बरोबरच मराठी कवी संमेलन झाले पाहिजे असा आग्रह धरला. आणि मग मंगेश पाडगावकर,वसंत बापट, विंदा करंदीकर,देविदास सोटे, सुरेश भट,मधुकर केचे,सुरेश वैराळकर, म भा चव्हाण,प्रदीप निफाडकर असे कितीतरी कवी कवी संमेलनाच्या निमित्ताने श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये येऊन गेले .डॉक्टरसाहेबांनी साहित्य संगमच्या माध्यमातून जे काम केले तसेच आम्हाला जी साथ दिली ती शब्दातीत आहे. त्यांचा साहित्य वर्तुळात जो वावर होता त्यावरून मधुकर केचेसर म्हणायचे डॉक्टर साहेब तुमचं नाव राठी नाही मराठी पाहिजे होतं .डॉक्टर साहेब असताना रोज सायंकाळी पाच वाजता माझी पावलं डॉक्टर साहेबांच्या बंगल्याकडे वळायची.मांगीलाल प्लॉटमधील त्यांचा हा बंगला सायंकाळी मी अमर अग्रवाल, अरविंद ढवळे,सुखदेव लढ्ढा, गोविंद भाई राठी ,राजकुमार जैन यांना बसण्याचा अड्डा झाला होता. रोज अल्पोपहार व्हायचा. चहा व्हायचा .तोपर्यंत सात वाजायचे .मग डॉक्टर दवाखान्यात जायचे .तोपर्यंत अमरावतीच्या समाजकारणावर, राजकारणावर,साहित्यिक विश्वावर आमच्या चर्चा चालायच्या. असा हा थोर माणूस अचानकच आमच्यामधून निघून गेला .त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी दवाखान्यात होतो. तो योगायोग मानावा लागेल. डॉक्टर साहेबांना दवाखान्यात भरती केल्यानंतर प्रवीण आणि प्रतीक सुरभी मुंबईवरून आले. मध्यरात्र झाली होती. विद्या प्रतीकसह मी दवाखान्यातच थांबलो होतो .डॉक्टर साहेबांनी आमच्या देखत प्राण सोडला. अमरावती शहरातील समाजकारण वैद्यकीय क्षेत्र साहित्यिक विश्व तपोवन हे पोरकं झालं .या माणसाने आपलं पूर्ण जीवन तन-मन-धनाने समाजासाठी साहित्यिकांसाठी तपोवन साठी अर्पित केलं होतं. अशी माणसे आज दुर्मिळ झालेली आहेत. डॉक्टर साहेबांच्या आजच्या जयंतीनिमित्त त्यांना मनापासून मानवंदना .

=============

*प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे*

सचिव साहित्य संगम अमरावती 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + ten =