You are currently viewing सावंतवाडी रुग्णालयातील “सोनोग्राफी मशीन” रुग्णांच्या सेवेत दाखल

सावंतवाडी रुग्णालयातील “सोनोग्राफी मशीन” रुग्णांच्या सेवेत दाखल

सामाजिक संस्थांच्या मागणीला यश…

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयातील “सोनोग्राफी मशीन” अखेर रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. या मशीनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात गरोदर महिलांना ही सेवा मिळणार असून ती मोफत असल्यामुळे रुग्णांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड थांबणार आहे. यासाठी सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मोठे प्रयत्न करण्यात आले होते. याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिली.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यामुळे रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध व्हावी, अशी मागणी रुग्णांच्या वतीने सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे राजू मसुरकर यांनी केली होती. त्यानंतर महिन्याभरापूर्वी या ठिकाणी सोनोग्राफी मशीन दाखल झाले. मात्र टेक्निशियन नसल्याने ही सेवा सुरू होण्यास उशीर झाला. अखेर काल पासून पहिल्या टप्प्यात गरोदर स्त्रियांची प्रस्तुती विषयाशी आवश्यक चाचण्या करिता सोनोग्राफी मशीन सेवा सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी श्री. जाधव यांना दिली. तर दुसऱ्या टप्प्यात सोनोग्राफी संबंधित चाचण्या मुतखडा, प्रोस्टेल, हर्निया, पोटाचे विकार अशाही प्रकारच्या रुग्णांना ही सेवा लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यानुसार श्री. जाधव यांनी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता यासंबंधी टेक्निशियन व रेडीओलॉजिस तज्ञ डॉक्टर यांची नेमणूक नजिकच्या काळामध्ये लवकरात लवकर केली जाईल व सर्वप्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रेडिओलॉजी तज्ञ डॉक्टर पाठवण्याची व्यवस्था आम्ही लवकरात लवकर करू, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान सेवा सुरू केल्याबद्दल जिल्हा रुग्णालयाचे सिविल सर्जन डॉ. नागरगोजे व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांचे विशेष आभार सामाजिक बांधिलकी व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा