You are currently viewing खासगी बसला अपघात; ११ जणांचा जागीच मृत्यू

खासगी बसला अपघात; ११ जणांचा जागीच मृत्यू

जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरील दुर्घटना

 

रायगड :

 

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या जवळील घाटामध्ये एक खासगी बस २०० फूट खोल दरीमध्ये कोसळली. यामध्ये बसमधील ११ लोकांचा मृत्यू झाला असून, २८ लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून, जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. अपघातग्रस्ताच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम आहे. खासगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांवर कळंबोली आणि नवी मुंबई येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

या अपघाताची पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमध्ये गोरेगाव मुंबई येथील बाजीप्रभु झांज पथक होते. पुण्याचा कार्यक्रम संपवून हे पथक गोरेगाव येथे जात होते. घाटातील शिंगरोबा मंदिराजवळ बस आली असता चालकाचा बस वरील ताबा गेल्याने बस दरीमध्ये सुमारे २०० फूट कोसळली. या बसमध्ये ४० ते ४५ जण होते. हा अपघात पहाटे ४.३० च्या सुमारास घडला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देत जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देश दिले. तसेच अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा