You are currently viewing …..होय! स्वीकारले तुमचे आव्हान ! फक्त तुम्हीही ते मर्दासारखे स्वीकारून दाखवा !!

…..होय! स्वीकारले तुमचे आव्हान ! फक्त तुम्हीही ते मर्दासारखे स्वीकारून दाखवा !!

—“नितेश राणे राजीनामा मागणी” वर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी घेतला सतीश सावंत आणि संजय पडते यांचा चांगलाच समाचार

खा. नारायणराव राणेंना आव्हान देण्याची स्वतःची खरोखरच योग्यता आहे की नाही, हे शिवसेनावासी झालेल्या सतीश सावंत आणि संजय पडते यांनी एकदा स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून पाहण्याची गरज आहे. पण बहुधा उद्धवसेनेत जाताना स्वतःचा अंतरात्मा विकूनच तिथे प्रवेश मिळत असावा, त्यामुळे आता त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. आमदार नितेश राणे यांच्या राजीनाम्याने राणेंच्या हद्दपारीची तुम्हाला एवढी घाई का? अशी भ्याड आणि भेकड मागणी करण्यापेक्षा एकदा मर्दासारखे मैदानात उतरा. नीतेश राणे तुमच्या पक्षप्रमुखांच्या नाकावर टिच्चून कणकवलीतुन निवडून आले आहेत हे विसरू नका. या जिल्ह्यातील तुमच्या दोन्ही आमदारांच्या एकत्र मताधिक्यापेक्षाही अधिक मताधिक्य घेऊन त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तुमचे आव्हान आम्ही कधीही स्वीकारून नीतेश राणेंना राजीनामा द्यायला सांगून त्यांना पुन्हा मैदानात उतरु. पण भाजपाच्या जीवावर बांडगुळासारखे उगवलेले तुमचे खासदार आणि दोन्ही आमदार यांनीही राजीनामा देऊन पुन्हा एकदा त्यांच्या बरोबरीने निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवावी. चारही निवडणूका लढवायचे एकदा काय ते होऊनच जाऊ दे. एकदाच काय ते दूध का दूध और पानी का पानी होऊन जाईल आणि यापुढे जनता कोणाची हद्दपारी करणार हे सुद्धा दिसेलच. पत्रकार परिषदांमधून बालिश बडबड करण्यापेक्षा आमचे हे आव्हान स्वीकारा आणि तुमच्या इथल्या आमदार-खासदारांच्या राजीनाम्याचा एकदा काय तो मुहूर्त ठरवा, आपल्या कामातून जनतेशी विश्वासाची नाळ जोडले गेलेले आमचे आमदार नितेश राणे मैदानात उतरायला कधीही सज्जच असतील.

सतिश सावंत आणि संजय पडते यांनी आव्हानबाजी करण्यापूर्वी एकदा शिवसेना नक्की आहे कुठे याचा अभ्यास करावा. उगाच दंडाच्या नसलेल्या बेटक्या फुगवत बसू नये. तुमचे खासदार विनायक राऊत आणि वैभव नाईक व दीपक केसरकर हे दोन्ही आमदार केवळ भाजपाशी असलेल्या युतीमुळेच जनतेतून निवडून आले आहेत. कणकवलीमध्ये सतीश सावंत यांनी गद्दारी केली आणि तिथे शिवसेनेने त्यांना पक्षाचे अधिकृत चिन्ह देऊन गद्दारीला मान्यताही दिली. जिल्ह्यात इतरत्र देवेंद्रजी, मोदी यांचे अशा लोकमान्यता असलेल्या भाजपा नेत्यांचे फोटो आणि भाजपचे चिन्ह मिरवत प्रचार केलात म्हणूनच निवडून आलात. तुमच्यासारखी छुपी रुस्तमगिरी करून नितेश राणे निवडून आलेले नाहीत. ते युतीच्या विश्वासघातक्यांशी समोरासमोर आणि स्वतंत्रपणे लढले. तुमचे हद्दपारी करून दाखवण्याचे आव्हान स्वीकारून आम्ही नितेश राणेंना राजीनामा द्यायला सांगतो. पण आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत या तिघांनीही राजीनामा द्यावा. चारही निवडणुका एकाच वेळी होऊन जाऊ द्या, मग हद्दपारी काय असते ते त्राही त्राही झालेल्या जनतेचा रागच तुम्हाला यावेळी दाखवून देईल. तुम्ही कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या विरोधात गद्दारी केलीत तरी आमच्या पार्टीने आपली तत्वे आणि युतीचा धर्म पाळला. तुमच्यासारख्या स्वार्थी आणि विश्वासघातकी राजकारणाला त्याच पातळीवर उतरून उत्तर द्यायचा आम्ही निर्णय घेतला असता, आणि आमच्या अन्य उमेदवाराना पक्षाचे चिन्ह दिले असते तर आज वेगळे चित्र दिसले असते. तुमची हद्दपारी तेव्हाच झाली असती. आमच्या नेत्यांचे फोटो लावून विजय मिळवलात याचे जनात नको, निदान मनात तरी ऋण राहू द्याल एवढी अपेक्षा होती.

तुमचे आमदार आणि दोन्ही जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि संजय पडते जर एवढे कार्यसम्राट होते, तर मालवण पंचायत समिती, कुडाळ पंचायत समिती, कुडाळ नगर पंचायत का टिकवू शकले नाहीत? मालवण नगर परिषदेमध्ये भाजपशी युती नसती तर सत्ता आली असती का याचाही प्रामाणिक विचार करावा. नगरपंचायत कुडाळमध्ये वैभव नाईकांची कार्यक्षमता कुठे हरवली? अगदी कालपरवा भाजपाने सावंतवाडी नगरपरिषद, बांदा सरपंच आणि याच सतीश सावंतांचा मतदार संघ असलेली आंब्रड जिल्हा परिषद राणे साहेबानी तुम्हाला धुळ चारूनच भाजपाकडे आणली हे ही इतक्या लवकर विसरलात? भविष्यात कोण कोणाची हद्दपारी करणार हे या निकालावरून ठरवा. आज सिंधुदुर्गातील बहुसंख्य ग्रामपंचायती ते जिल्हा परिषद ही सत्तास्थाने राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडेच आहेत. युतीच्या कृपेवर निवडून आलेले आमदार खासदार म्हणजे शिवसेनेची ताकद नव्हे. ही तीन पदे मिरवत आव्हानबाजी करणाऱ्या तुमची अवस्था म्हणजे डोक्याला मुकुट आणि खाली नागडा असलेल्या राजासारखी दयनीय आहे. अंगातली खुमखुमी जिरवायची एवढीच हौस असेल तर या नागड्या राजांना आता घोड्यावर बसून युद्धमैदानात उतरवा, आणि हौस फिटवून घ्या एकदाची!! खूप झाली राणेंना आव्हानांची भाषा, आता एकदाच काय ती मर्दानगी दाखवून निवडणुकीच्या रणमैदानात उतरून तर दाखवा, हद्दपारी काय असते ते आम्ही तुम्हाला हद्दपार करूनच दाखवून देऊ, असा आरपारचा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली यांनी शिवसेनेच्या सतीश सावंत आणि संजय पडते या जोडगोळीला दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + five =