कणकवली
सायन्स ऑलंम्पियाड फाऊंडेशन, नवी दिल्ली च्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलंम्पियाड स्पर्धेत फोंडाघाट – नवीन कुर्ली वसाहत येथील मिहीर अनंत पिळणकर या विद्यार्थ्याने देदीप्यमान यश मिळविले आहे. या स्पर्धेत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथा तर प्रशालेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मिहीर हा हूमरट- कणकवली येथील बी.एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीचा विद्यार्थी आहे. याबद्दल त्याला प्रशालेच्यावतीने गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन ने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय गणित यशा मुळे प्रशालेचा नावलौकिक वाढल्याची भावना व्यक्त करत प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी मिहीर याचे अभिनंदन केले.
मिहीर हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा सुपूत्र आहे. मिहीरच्या या यशाबद्दल अनंत पिळणकर यांनी बी. एन. विजयकर स्कूलचे मुख्याध्यापक व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले आहेत. मिहीर याचे प्रशालेतील विद्यार्थी, पालक तसेच कुर्ली वसाहत व फोंडाघाट ग्रामस्थांनी कौतुक केले.