You are currently viewing टोलधाडी विरोधात राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक ; सा. बां. मंत्र्यांना टोल नाक्यावर अडवण्याचा इशारा – अरविंद मोंडकर 

टोलधाडी विरोधात राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक ; सा. बां. मंत्र्यांना टोल नाक्यावर अडवण्याचा इशारा – अरविंद मोंडकर 

महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल सुरु करण्यास विरोध

मालवण

मुंबई – गोवा महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यातुन जाणाऱ्या महामार्गाचे अर्धवट काम असताना रस्त्यावर खड्डे, बॉक्सवेल, रस्त्यावर भेगा पडणे, साईड पट्टी मधील ब्लॉग निखळणे, बॅरेकेट्स, डीवायडर मार्गदर्शक फलक, अश्या अनेक त्रुटी याठिकाणी आढळतात. गेल्यावर्षी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या कामास वाढीव निधी दिला होता. मात्र आताच्या सरकारने या निधीचा ठेकेदारा कडून तपशील व ऑडिट रिपोर्ट घेतलेला नाही. हे काम मुदतीत पूर्ण झालेले नसताना काम पूर्ण होण्यास लागणारा कालावधी याची हमी सरकार देऊ शकत नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाला तर माहितीच नाही. अशा परिस्थितीत कणकवली ओसरगाव येथील टोलनाका सुरु करण्यास राष्ट्रीय काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. या महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल घेऊ देणार नाही असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर हा टोलनाका सुरु झाल्यास राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाच टोलनाक्यावर अडवण्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी दिले आहे.

या सरकारला जनतेच्या खिशाची लूट करण्याची घाई झालीय असं दिसून येत आहे. मुळात हा टोलनाका जिल्हा वेशीवर असणे गरजेचे होते. परंतु जिल्ह्यात मधोमध हा वसुली नाका उभारून जिल्ह्यातील सामान्य जनतेला, लहान सहान व्यावसायिकाना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. काही वर्षापूर्वी आम्ही जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून या रस्त्याची दोनवेळा पाहणी केली, त्यावेळी जिल्हा महसूल प्रशासन पोलीस प्रशासन यांस रीतसर पत्रव्यवहार केला होता व यात असलेल्या त्रुटी संबंधित ठेकेदार व शासनास दाखवून दिल्या होत्या. आंदोलन देखील केलं होतं. गेल्या महिन्यात जिल्हा प्रशासनास पुन्हा लेखी पत्र देऊन हा टोलनाका जिल्ह्याच्या वेशीवर नेण्यासाठी विनंती केली. परंतु जिल्हा प्रशासनाने देखील कोणतंही समर्पक उत्तर दिल नाही.

महामार्गाच ऑडिट अजून पूर्ण झालेलं नाही असं असतांना जिल्हाधिकारी मात्र महामार्ग प्राधिकरण यांस सपोर्ट करत असल्याचं दिसुन येत आहे. उद्या आम्ही रस्त्यावर उतरल्यावर मात्र जिल्ह्यात जमाव बंदी लादायला जिल्हाधिकारी तयार असतील, अधिकाऱ्यांच्या अशा नाकर्तेपणामुळे गेली बारा वर्षे या महामार्गाच काम रखडल आहे. गेली अनेक वर्षे तळकोकणातील जनता जीव मुठीत घेऊन प्रवास करीत होती व आजही तीच स्तिथी आहे. प्रशासन व ठेकेदार यांच्या गलथान कारभारा मुळे अनेकांना तर आपले प्राण ही गमवावे लागले होते. त्यावर स्थानिक वृत्तपत्रांनी देखील दखल घेतली होती. या सर्वांची कात्रणे आजही आमच्या जवळ असून आता दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या ठिकाणी जाऊन उपोषण करायचे का.. ? तिथे जाऊनही या ठेकेदाराची मनमानी व सध्या स्तिथीतील परिस्थिती आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असे अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा