ना.राणेंनीही तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना उचित कार्यवाहीच्या दिल्या सूचना
हायवेमुळे कोकणची कशी प्रगती होईल याची नेहमीच चर्चा सुरू असते. मात्र याच हायवेमुळे कुडाळमधील काही नागरिकांना घरात जाण्यायेण्याचा मार्गच बंद झाला आहे. कासावीस झालेल्या नागरिकांना खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांना उचित कार्यवाहीच्या सूचना दिल्यानंतर आशेचा किरण निर्माण झाला आहे.
याबद्दलची माहिती देताना कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी म्हंटले आहे की कुडाळ नगरपंचायत क्षेत्रांमधील श्रीरामवाडी ते वडेश्वर मंदिर येथील महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. कुडाळ शहरातून जाणारा रस्ता हा वस्तीतून जात आहे व शहराची वस्ती महामार्गाच्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर असल्याने बॉक्सवेलच्या ऐवजी फ्लायओव्हरची मागणी करण्यात आली. परंतु त्यानंतर पुन्हा ग्रामस्थांच्या अनेक बैठका झाल्या, त्यामध्ये ठोस निर्णय न झाल्याने अखेर रस्ता आहे तसाच रुंद करण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात आला. निर्णय घेतेवेळी रस्त्याच्या पलिकडे जाण्यासाठी सबवेची मागणी करण्यात आली व सबवेचे काम सुरू करण्यात आले. परंतु त्यामुळे चायना टाऊन ते मंदार परुळेकर निवास यादरम्यान रस्ता पाच मीटरने सबवेला जोडण्यासाठी खाली गेला. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना रस्त्यावर येण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे. प्रांत कार्यालय, सार्वजनिक बांधकाम व भूमिअभिलेख यांच्यातील समन्वय योग्य नसल्याचे मला अनेक वेळा आढळून आले आहे. या विभागामुळेच ही अडचण निर्माण झाली आहे. खासदार नारायणराव राणे यांनी यामध्ये व्यक्तीश: लक्ष देऊन मार्ग काढावा, अशी मागणी कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी त्यांच्याकडे केली होती.